तेली समाजाला महानगरपालिकेत मानाचे पान मिळवून देणारे आबा बागूल. गेल्या 30 वर्षांपासून अखंड महानगरपालिकेत आपला पाय रोवून बसलेले आबा हे खरंच आपल्या समाजाचे भूषण आहे. आबांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या वॉर्डातून समाजकार्य करत असताना आपल्या समाजाइतकेच इतर समाजावरही तितकेच प्रेम केले. गेली कित्येक वर्षे मी पाहतोय आबांनी हजारो लोकांना काशीचे दर्शन घडविले. तसेच वॉर्डाचा विकासही आधुनिक पद्धतीने केला. आज ई लर्निंग स्कूल स्थापन करून देशात नावलौकिक मिळविला. सध्याच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनातून आपले अढळस्थान निर्माण करणार्या आबांनी सामाजिक बांधीलकी जोपासत इतर समाजाचीही सेवा केली. म्हणूनच आबांना श्रावणबाळ म्हटले जाते.
या कलियुगात कित्येकांना स्वतःच्या आईवडिलांना काशी घडविता येत नाही. पण आबांनी हजारो मातापित्यांना काशी घडवून आणली. हे पुण्य आणि आपल्या वॉर्डात माता महालक्ष्मीचा साक्षात्कार झाल्याने आबांनी याठिकाणी भव्य असे मंदिर उभारले. महालक्ष्मीचा आशीर्वाद आणि मातापित्यांची पुण्याई याच्या जोरावर आज आबांनी प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केले. पुणे महानगरपालिकेत मागील वर्षापासून आबांनी संत शिरोमणी श्री संताजी महाराजांच्या नावाने पुरस्कार सुरू केला. खरं तर या पुरस्काराचे खरे मानकरी स्वतः आबाच आहेत. पण महानगरपालिकेत पुरस्कार जाहीर करून तो स्वतः घेणे योग्य नसते हे जाणून आबांनी इतर समाजातील मा. उल्हासदादा पवार यांच्यासारख्या व्यकिमत्त्वाला देऊन समाजाच्या दानशूर वृत्तीचे पुन्हा एकदा दर्शनच घडविले. पुरस्कार मिळविण्यासाठी आपल्या समाजातील एकाही व्यक्तीचे कार्य नाही ही खंत आहे. सर्वांनी किमान आबांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून या पुरस्काराचा मान मिळविण्यासाठी आदर्श व निस्वार्थी समाजकार्य करावे. भविष्यात आबांना प्रश्न पडला पाहिजे की, आता हा पुरस्कार मी कोणाला देऊ. अशा पद्धतीने काम आपल्या समाजात व्हायला पाहिजे. आजपर्यंत आबांकडे मदतीचा हात मागायला गेलेल्या कुठल्याही समाजबांधवांना आबांनी रिकाम्या हातांनी परत पाठविले नाही. तसे पाहिले तर आबांना राजकारणात आपले स्थान निर्माण करत असताना आपल्या समाजापेक्षा इतर समाजातूनच मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले हे आपण नाकारू शकत नाही. तरीही आबांनी समाजावरचे प्रेम कधीही कमी केले नाही. नुकत्याच झालेल्या तिळवण तेली समाजाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आम्हा नमो नम: पॅनेलच्या सर्व उमेदवारांना अनमोल मार्गदशर्न केले. तुमच्याकडून पाच वर्षात समाजाकडून खूप अपेक्षा आहेत. समाजाने तुमच्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशा पद्धतीने समाजाचा विकास करा, असा मोलाचा सल्ला आबांनी यावेळी दिला. आता आपल्या समाजाचेही कर्तव्य आहे की, आजपर्यंत ज्या आबांनी पुणे महानगरपालिकेत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे गटनेतेपद आणि उपमहापौरपद अशी मानाची पदे आपल्या कार्याच्या जोरावर भोगली. त्या आबांना आता आमदार करण्यासाठी जोमाने प्रयत्न केले पाहिजेत. तरच आपल्या समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाईल. आबांबाबत लिहिताना माझे शब्द अपुरे पडतील असे महान कार्य आबांचे आहे. आबांकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आबांकडे पाहिले तरी निम्मे टेन्शन कमी होते. त्याचे कारण म्हणजे आबा सतत सर्वांचे हसतमुखाने स्वागत व आदरातिथ्य करतात. ही त्यांना दैवी शक्तीच आहे. परमेश्वराने आपल्या समाजात खरंच हिरा जन्माला घातला आहे. त्याला पैलू पाडायचे काम आपल्याला भविष्यात करावयाचे आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत आबा नक्कीच आमदार होतील, अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद! जय संताजी.
- दिलीप शिंदे, कोथरूड