लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (1)
वैदिकांचे पाश, सामाजिक बांधिलकी आणि सिंहावलोकन
जंगलाचा राजा म्हंटला जाणारा सिंह प्रत्येक पाच पाऊलानंतर मागे वळून पाहतो . आज लिंगायत समाजाने पण सिंहावलोकन करण्याची गरज आहे. लिंगायतांच्या इतिहासाची पाऊले पुसणारी काही वैदिक भटावळ तयार होत आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने लिंगायत धर्म आज पेच प्रसंगात सापडलेला दिसतो, वैदिक व्यवस्थेचे आक्रमण मोठ्या प्रमाणावर आजही लिंगायतावर होत आहे. लिंगायत धर्माची तत्वज्ञान आणि आचारसुत्रे याचा बारकाईने अभ्यास करून आज समाजाने समजून घेणे खूप गरजेचे आहे. सामाजिक बांधिलकी जपताना काही अंशी लिंगायत आपल्या तत्वज्ञानाला मुरड घालताना दिसत आहेत. त्या सत्येच्या पोटी नारायणापासून जन्मलेल्या सत्यनारायणाचे पूजन आणि वैदिक रुद्रासुक्तांचे पाठ श्रावण महिन्यात आणि गणपतीच्या दिवसात बऱ्याच लिंगायत करत असल्याचे माझ्या ऐकिवात आहे. वचन चळवळीपासून दूर गेल्याचा हा परिणाम आहे असे नक्की सांगता येईल. बसवण्णा आपल्या वचनात म्हणतात, निष्ठावान पतीला एकच पती असे पहा, निष्ठावान भक्ताला एकच देव आहे पहा. तरीही हे वचनाची जोपासणारे शरण आज अल्प प्रमाणात दिसत आहे. म्हणून आज वचन साहित्य वाचून लिंगायतानी सिंहावलोकन करणे गरजेचे आहे. गणेशोत्सव, नवरात्री, मोहरम या सणांच्या वाढत्या प्रभावाखाली आज लिंगायत युवक खेचला गेला आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून युवकांनी या सण-समारंभात भाग घेण्यास हरकत नाही पण वैदिकत्वाचे ढोल बडविण्याची त्यांना काही गरज नाही. भाईचारा निर्माण व्हावा यासाठी अवश्य सहभाग नोंदवावा पण आहारी जाऊ नये. डॉ. एम. एम. कलबुर्गी म्हणतात, संग्रहास परिश्रम पाहिजेत, संकलनास आणि पांडित्य पाहिजे, संपादनास परिश्रम, पांडित्य आणि प्रतिभा तिन्ही आवश्यक आहेत. असे असेल तर आज लिंगायतांनी चार पाऊले पुढे टाकताना एकदा मागे वळून पाहिले पाहिजे. आम्ही नक्की संग्रह कशाचा केला, आम्ही बसवादि शरणांच्या विचारांचा वचनांचा संग्रह कधी केला का ? आम्ही महापुरुषांच्या विचारांचा संग्रह कधी केला का ? आम्ही दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या साहित्याचा आणि विचारांचा संग्रह कधी केला का ? याचे सर्वांना आत्मपरीक्षण करावे लागेल. आजच्या तथाकथित माता बारा महिने वैदिकांच्या व्रत-वैकल्यात अडकलेल्या , व्हाट्सअपच्या जंगलात रस्ता हरवुन बसलेल्या दिसून येतात. एका बाजूला महिलांची ही अवस्था तर पुरुषांची अवस्था याहून वेगळी नाही, टेलिव्हिजन, सोशल मिडिया यामध्ये गर्क असणारा पुरुषवर्ग आपल्याला दिसत आहे. जर मातापित्याची ही अवस्था असेल तर त्या मुलांकडून काय अपेक्षा ठेवायची. आजचे मातापिताच लिंगायत तत्वज्ञानाचे बाबतीत अनभिज्ञ दिसत आहेत, तर मुलांकडे ते येणार कोठून ? मूळ स्वरूप बदलुन काही अंशी संज्ञा त्याच राहिल्या, काही ठिकाणी नावे तीच स्वरूप मात्र बदलले. म्हणून अष्टावरणातील नावे तीच असली तरी त्यांचे संज्ञा इत्तरांपेक्षा वेगळ्या पहायला मिळतात. (उदा.- गुरू: अरिवे गुरु). सद्य परिस्थिती मांडत असताना सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, साहित्य , धार्मिक या सर्व बाबींचा आपल्याला विचार करावा लागेल. संगीत, नृत्य , नाट्य, कला इ. क्षेत्रात लिंगायतांचे किती योगदान आहे. सामाजिक क्षेत्रात राजकारण, समाजसेवा, सेवाभावी संस्था यात काम करणारे किती लिंगायत आहेत. शिक्षक, प्राध्यापक, खाजगी शिक्षण संस्था चालविणारे लिंगायतांची संख्या किती आहे हे पण पाहिले पाहिजे. बँक, पतसंस्था किंवा अन्य वित्तीय व्यवहार करणारे लिंगायत कितपत आहेत. लेखक, संशोधक, प्रकाशक या क्षेत्रात कार्य करणारा किती लिंगायत समाज किती आहे. याचे पण तुलनात्मक वर्गीकरण करावे लागेल.