नागपूर - जवाहर विद्यार्थी गृह म्हणजे तेली समाजाच्या मान्यवरांनी एकत्रित येऊन केलेली महत्त्वाची समाजसेवा आहे. समाजातील विद्यार्थ्यांंना शिक्षणासाठी राहण्याची सोय व्हावी आणि त्यांच्यावर महाविद्यालयीन जीवनात चांगले संस्कार व्हावेत, या उद्देशाने जवाहर विद्यार्थी गृहाची स्थापना करण्यात आली. त्याअंतर्गत विद्यार्थी गृह, वाचनालय, व्यायामशाळा बांधण्याचा संकल्प करण्यात आला. माजी अबकारी मंत्री माकडे गुरुजींनी सिव्हिल लाईन परिसरात जवाहर विद्यार्थी गृहासाठी जागा मिळवून दिली. १९५२ पासून येथे विद्यार्थी गृह चालविण्यात येत आहे. जवाहर विद्यार्थी गृह सिव्हिल लाईन्स आणि न्यू नंदनवन येथे काढण्यात आले आहे. सिव्हिल लाईन्स परिसरात भव्य सभागृहाची निर्मिती करण्यात आली. समाजातील गरीब आणि गरजूंना नाममात्र शुल्कात हे सभागृह उपलब्ध करून दिले जाते. याशिवाय विविध उपक्रम सातत्याने वर्षभर राबविण्यात येतात. यात प्रामुख्याने विद्यार्थी केंद्रस्थानी आहेत. शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि गुणवंतांचा सत्कार तसेच गरीब विद्यार्थ्यांंंना शालेय वस्तूंचे वितरण, गणवेश आदी दरवर्षी वितरित करण्यात येतात. वर-वधू परिचय मेळाव्यासह सामूहिक विवाहाची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष रमेश गिरडे आणि सचिव शंकरराव भुते यांनी रुजविली. यामुळे अनेक कुटुंबांचे भले झाले. व्याख्यानमाला, परिसंवाद, योग स्पर्धा, विविध प्रशिक्षण आणि गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी दत्तक योजना आदी उपक्रम समाजाची सेवा म्हणून राबविले जातात.
पूर्वी हे विद्यार्थी गृह तेली समाजाच्या नावाने होते. पण सध्या येथे सर्व समाजातील विद्यार्थी आहेत. त्यामुळेच आता केवळ जवाहर विद्यार्थी गृह असे नाव ठेवण्यात आले. नुकतेच महिलांसाठीही एक व्यासपीठ निर्माण करण्यात आले. यात महिलांना प्रशिक्षण, रोजगाराचे उपक्रम, विविध स्पर्धा, मार्गदर्शन शिबिर आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यात रमेश गिरडे यांच्यासह शंकरराव भुते, गुलाबराव जुननकर, चंद्रकांत ढोबळे, पंढरीनाथ ढोबळे, मिलिंद माकडे, शेषराव सावरकर, शेखर बाळबुधे यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. संत जगनाडे महाराजांचे एक मंदिर येथे उभारण्यात आले आहे. संताजींच्या विचारांवर समाजाच्या प्रत्येक घटकाची सेवा करण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे