आपल्या देशाने अधिकृतपणे जागतिकीकरणाचा स्वीकार केला. जागतिकीकरण एकटे आले नाही. त्याच्याबरोबर खाजगीकरण आणि उदारीकरण आले. ही खाउजा संस्कृती म्हणजे जगभरातल्या भांडवलदारांसाठी भारतीय बाजारपेठ उपलब्ध होणे. करार-मदार करून हे झाले आणि आपल्या देशात एक बाजाराधिष्ठित संस्कृती उदयाला आली. प्रत्येक गोष्ट बाजारीकरणाच्या दृष्टीने पाडली जाऊ लागली. प्रत्येक गोष्ट विकावू झाली. माणसाची मूल्यही बाजाराच्या चढ उताराप्रमाणे ठरवली जाऊ लागली. एकदा माणूसच बाजारातील वस्तू झाला की बाकी सगळीच मुल्य ही बाजारात उभी राहतात. चांगले काय वाईट काय श्रेयस काय आणि प्रेयस काय एवढेच काय धर्मासारख्या गोष्टीही बाजारात बोलल्या जातात तोलल्या जाऊ लागल्या आहेत. या सार्याचा परिणाम भारतीय समाजजीवनात असंख्य अंतर्विरोध निर्माण झाले. असंख्य संघर्ष निर्माण झाले. विषमतेची भली थोरली दरी निर्माण झाली. आणि सर्वसामान्यांचे जगणे मरणाच्या दारात येऊन ठेपले. त्यांच्या सगळया जगण्यालाच कोळीष्टीके लागली. जागतिकीकरणाचे वारे सुरू झाली त्याचे परिणाम होणारच होते. जेव्हा अशा प्रकारचे लक्षणीय बदल होतात तेव्हा त्याची बरेवाईट परिणाम होणारच. इतिहासामध्ये असे दाखले सापडतात. यांत्रिकीकरणाचा प्रारंभ झाला आणि भारतातील सारे कारागीर देशोधडीस लागले. त्याला चिंता होती ना त्यांच्यासाठी काही करावे असे कोणाला वाटत होते. सारे खुरडत खुरडत जगत राहिली आणि काळाच्या पोटात गडप झाले. त्यातही आक्रंदही कोणाच्या कानावर गेला नाही. आणि आता तर या जागतिकीकरणाबरोबरच यंत्र आणि तंत्राचे प्राबल्य वाढले आहे. यंत्र आणि सारी तंत्र भांडवलदारांच्या मालकीची झाली आहेत. श्वसनाची गती वाढलेली आहे. जीवघेणी स्पर्धा वाढलेली आहे आणि शोषितांचे हे बघून घे हवेतल्या हवेत विरून जात आहेत. हजारो शेतकर्यांनी स्वतःला माती आड लोटून दिले आहे. कष्टकर्या जवळ कष्ट करण्याची हिंमत आहे पण त्याला मात्र मोल उरलेली नाही. अशा सगळ्या विपरीत वास्तवात फक्त कवी बोलू शकतो. कारण तो संवेदनशील असतो. सकमते पार्क त्यांच्या अंतरंगातून वाहत असतो. तो समोरचे विपरीत बघतो आणि कोणाचीही पर्वा न करता बोलत राहतो. असे बोलण्याची फार प्राचीन परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर संत नामदेव आणि संत तुकाराम ही कवींची प्रातिनिधिक नावे आहेत. या कवींनी भोवतीच्या हितसंबंधी मंडळी की परवा न करता जे पाहिले ते मोठ्या संवेदनशीलतेने व्यक्त केली. इतर लोक हे करू शकत नाहीत. कारण ते व्यवस्थेत गुंतलेले असतात. व्यवस्थेचे लाभर्थी असतात. कवी त्या समाजाचा भाग असला तरी व्यवस्थेकडे तटस्थपणे पाहत असतो. त्या व्यवस्थेतून आकाराला येणारी वेदना त्याला जाणवत असते. किंबहुना त्यामुळेच तो कवी असतो. सुखाची किनार त्याला दिसते. पण तशी तर ती सर्वांनाच दिसते. परंतु यांना मात्र सार्यांना दिसतात तसे नाही. परंतु वेदना मात्र सार्यांना दिसतातच असे नाही. त्या फक्त कवीला दिसत असतात. किंबहुना वेदनेचे दुसरे नावच कवी असते. असाच एक वेदनेचा हुंकार मांडणारा कवी म्हणजे अरूण इंगवले. त्यांनी आजच्या वास्वताचा सर्व परिणामांनी अतिशय प्रत्ययकारीरित्या वेध घेतला आहे. आजची मूल्यविहीनता, संस्कृतीला, प्राप्त झालेले दिखाऊ आणि बाजारी स्वरूप, ग्रामीण जीवनाचे उद्धस्तीकरण आणि माणसाला प्राप्त झालेले बाजारू स्वरूप हे सारे सारे त्यांच्या कवितेमध्ये साकार येतात. नुसत्या धीटपणेच नाही, तर ते चिंतनशीलतेच्या पातळीवरही पोचतातत. म्हणूनच त्यांची कविता चिंतनशीलतेच्या परिघात जाऊन पोचते तत्त्वचिंतनाची डूब असणार्या या कवितांना वेगळीच उंची प्राप्त होते.
अवतीभवतीच्या घटना, परिस्थिती, मानवी वर्तन, विसंगती, दंभ अशा अनेक गोष्टींचे निरीक्षण अरूण इंगवले यांच्या कवितेत सूक्ष्मपणे येते. संवेदनशीलता हरवत चाललेल्या वर्तमानात ज्याच्या हाती शब्दांचे सामर्थ्य आहे असा इंगवलेंसारखा माणूस आपलं मन कागदावर न उतरवेल तर नवलच जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रांना घेरून अधिकाधिक गडद होत जाणारं धुकं सुर्य नावाच्या विवेकावादी स्वयंभू सत्याला घेरू पहाातंय हा संदेश या संग्रहातून दिला जातोय. आबूट हा शब्द इंगवले ज्या परिसरात राहातात त्या परिसरात धुक्यासाठी वापरला जातो. त्यामुळे ते ज्या कोणाच्या व्यथा, वेदना, वास्तव मांडणार आहेत, त्यासाठी आबूट घेर्यातला सूर्य हे काव्यसंग्रहाचे शीर्षक अत्यंत समर्पक वाटतं. याचा शीर्षकातून त्यांना नकळतपणे एक आशावाद मांडायचा आहे. धुक्याचं हे घेरणं काही काळापूरतं आहे. अखेर सूर्य नावाचं शाश्वत सत्य तेजाने तळपणारच आहे.
या संग्रहातील प्रत्येक कविता धीटपणे काही तरी बोलू पाहाते आहे, आजच्या समाजावर, तीमधील वास्तवावर भाष्य करू पहाते आहे. या वास्तवामधील विपरीतपणा उजागर करू पहाते आहे. कवी जेव्हा बोलतो, म्हणजे कवि कविता लिहतो तेव्हा तिला अनेक पदरीपणामुळेच ती समर्थ होते. या सगळ्या गोष्टी तर असतातच, पण तिच्यात प्रमुख असे दोन स्तर असतात. एक म्हणजे भोवतालच्या वास्तवाचा आरणि दूसरा म्हणजे एकूण मानवी जीवनासंबंधीचा. किंबहूना एकूण मानवी जीवनातील मूल्यांच्या अनुषंगानेच तो सभोवतीच्या वास्तवाचा अर्थ शोधू पाहातो. मानवी जीवनातील सनातन मूल्ये हरवली की जिवन अर्थहीन होत जाते. म्हणूनच कवी मानवी जीवनातील सनातन मूल्यांच्या अनुषंगाने (उदा. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, आंतरिक प्रेम इ.) भोवतीच्या वास्तवाकडे पहात असतो. त्यातून त्याला विपरीत काय ते दिसते आणि वेदनाही हृदयाला भिडत जाते. अरूण इंगवले यांच्या संपूर्ण कवितेचे हे इत:सूत्र आहे, असे म्हणता येईल. तीक्ष्ण संवेदनशीलता, सूक्ष्त अवलोक आणि शब्दसार्मर्थ्य असल्याशिवाय अशा सकस कविता जन्मात नाहीत. या संदर्भात त्यांची अराजक ही कविता पाहाता येईल.
जमिनीवर वेगवेगळ्या बुंध्यावर असणारी ही झाडं
जमिनीखाली मात्र यांची मुळ एकमेकांत गुंतलेली
हे सत्य ठाऊक असणारा भुरकट सावळा ढग
आशेची अंधुकशी खूण घेऊन तरंगत चाललाय
संभवामि युगे युगे पुटपुटत
ही कविता वरकारणी पानगळीची, निष्पर्ण होणार्या, वठत जाणार्या जंगलाची वाटते. परंतु हा झाला बाह्य स्तर. पारंपारिक भाषेत सांगायचे तर वाचार्थाचा स्तर. पण कवीला या वाचार्थात रस नाही. त्याला त्यातून असे सुचवायचे आहे ते भोवतीचे निष्पर्ण आणि विद्रूप होत जाणारे, विपरीत वास्तव. माणसं निष्प्राण होतहेत, त्यांचा ज ीवनरस कुठल्यातरी उष्ण झळा शोषून घेताहेत. आपण सारेच एका अराजकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, हेच येथे कविला सूचित करावयाचे आहे. शेवटी जो आशादायी सूर आहे तो कृष्णाला उद्देशून नाही तर निसर्गच्रकाला उद्देशून आहे. निसर्गचक्र हेच सनातन मूल्यांच्या रूपात येते. म्हणजे येथे दोन स्तर येतात. आणि भोवतीचे विपरीत वास्तवही प्रकट होऊन जाते, ते प्रत्यकारी भाषेमध्ये.
अरूण इंगवले यांची संपूर्ण कविता ज्या परिसरातून येते, तो परिसर ग्रामीण आहे. निसर्ग समृद्ध कोकणातला असला तरी ग्रामीण आहे. म्हणून झाडे, वड, अरण्य अशा गोष्टी येत असल्या तरी त्या सौंदर्यपूजक वृत्तीतून येत नाहीत. कारण या सार्या गोष्टींनी वेढलेला ग्रामीण माणूस आणि ग्रामिण परिसर हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. कारण सगळा ग्रामीण परिसर असंख्य वेदनांनी होरपळतो आहे. त्यांनी साहिलेला पाहिलेला भावतालतितक्याच प्रखर शब्दात कवितेत अभिव्यक्त होतो आहे. अनुभूतीतून आलेल्या वास्तवाच्या मांडणीमुळे त्यांची कविता घुसमटणार्या कोकणाची धीट प्रवक्ती म्हणून समोर येते.
कोळीष्टक सारख्या कवितेतून ग्रामीण जनजीवनातील दु:ख आणि दारिद्रय व्यक्त होत राहातं. पोरीच्या लग्नासाठी घरच गहाण टाकावे लागतं तेव्हा म्हतारीला कोळीष्टकांना बेघर करू नये असे एक ज्ञान होते. तर भिक्या या कवितेत दारूबाज भिक्या दारू पिऊन झोपी जातो, तर त्याच्या वाट्याचे अन्न त्याची बायको पोरांना वाटून देते. असा सारा परिसर दारिद्रयाच्या दु:खाने होरपळून निघालेला.
जागतिकीकरणानंतर ग्रामीण परिसर अधिकच बकाल झाला. हे बकालपण, हे दारिद्रय टवटवीत होऊन त्यांच्या कवितेतून प्रकट व्हायला लागतं. जागतिकीकरणाचे अपरिहार्य परिणाम सर्वाधिक ग्रामीण भागालाच भोगावे लागत आहेत, याची जाणीव त्यांच्या कवितेतून ठिकाणी प्रकट होत राहाते. या संदर्भात पत्ताा इंडियाचा आणि महासत्ता या त्यांच्या दोन कविता पाहिल्या तरी विषमतेची विस्तारत जाणारी भयकारकर दरी आपल्या लक्षात येईल. पत्ता इंडियाचा या कवितेत दरवाजाचा आयहोल हा दोन समाजिक स्तरांमधील संपर्काची प्रतिमा खूप काही सांगून जाते. प्रतिमांमधून व्यापक आशय चिमटीत पकडणे ही अरूण इंगवले यांच्या कवितेची फार मोठी ताकद आहे. दिवाळीच्या सुुगंधित वातावरणात जेव्हा भिकारी येतो तेव्हा या सामाजाचाच एक घटक असणारा कवी म्हणतो.
माझ्या कवटीवरची डोअरबेल वाजत राहाते
आयहोलमधून दिसत राहातो त्याचा लाचार चेहरा
पुन्हा पुन्हा पत्ता विचारणारा
महासत्ता होऊ पाहाणार्या इंडियाचा
महासत्ता ही कविताही अशीच खेड्याचे दु:ख सांगणारी. शाळेत जाणारा पोरगा शाळेत ऐकलेली स्वप्नं आईबापाला सांगू इच्छितो तर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला बाप
उद्यापासून कामाला चल असे सांगू राहातो.
आधारस्तंभ, महासत्ता, भवितव्य
वगैर ओठांवर काढून ठवेलेले शब्द त्याने समंजसपणे गिळले
आणि काळोख वाचीत मुकाट बसून राहिला
मॅट काळोखात
मौनाची महासत्ता पेलीत.
बारकू, साहित्याची जात, गावपळण यासारख्या कविता कोकणच्या दुर्देवाचे दशावतार प्रत्याला आणून देतात. या कवितांमधून आणि इतरही अनेक कवितांमधून कोकणातल्या बोलीभाषेतील शब्द प्रवाहिपणे येत रहातात. विस्मृतीत गेलेले काही शब्द या कविता नव्याने पुन्हा रूढ करू पहातात ही मराठीच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे.
यंदा गणपती पाच दिवसांचे, खूप वर्षांनी गावात, कसायाचा पत्ता, बावीच्या काठावर, आत्महत्या झाडाची, बागेत पाळलेलं उन्ह, पुरूषार्थ, सृजनशील ओकारी अशा कितीतरी कविता ग्रामजीवनाचे बकालपण, भोवतीच्या वास्तवातील ताणतणाव, विषमतेनं होरपळणारं जिण आणि या सार्यांनी कुचंबून गेलला माणूस प्रकट करीत राहातात.
कालापटाबद्दल एक प्रल्गभ जाण आणि प्रखर संवेदशीलता ही या कवितेची बलस्थांन आहेत. वाचकाला अस्वस्थ करण्याबरोबरच अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य या कवितेत आहे. कुठल्याही समाजाला एक भूतकालीन इतिहास असतो आणि एक समकालीन राजकारण असते. या दोन्हींचे आकलन कवी फार सशक्तपणे करतो. हा इतिहास, माणसाशी, माणूसपणाशी काही कर्तव्य असत नाही. तरीही माणसे इतिहासात रमण्यात धन्यता मानतात. या इतिहासाने खेड्यापाड्यातल्या माणसांची काय दैना केलीय, याचे इत्यासाचं असंच असतं मध्ये झालेले प्रकटन आपल्याला अंतर्मुख करून जाते. राबणार्यांचा इतिहास कुठं लिहीला जातो कां ? आपल्या घरी राबणार्या बौलांचा आणि गायींचा तरी कुठे कुणी इतिहास लिहीला असा प्रश्न नातू आजोबाला विचारतो आणि म्हणतो.
आज्या सातबार्याच्या तुकड्यावर तुझी नोंद
हाच मोठा इत्यास
जनावरांचा इत्यास नाही लिवला जात आज्या
आपली खानदानं पण जनावरच की त्यांच्या हिशोबी
इत्यास आपल्यासाठी नसतोय
मनाचं म्हणशील तं
मनाच इत्यास नाय लिवला जात.
इथे प्रस्थापित इतिहासाने गाडून टाकलेल्या असंख्य श्रमिकांचे स्मरणच कवी करतो आहे. शिवाय इतिहासाकडे पाहण्याचा एक नवाच दृष्टिकोन सूचित करतो आहे. इतिहासाची एक नवी मांडणी झाली पाहिजे हेही येथे सूचित होत जाते. या दृष्टीने अरूण इगवले यांनी इतिहासाचा एक वेगळा अन्यवयार्थ लावलेला आहे. इतिहासाज रमणार्यांना एक नवेच भान त्यामुळे येते. त्या दृष्टीने त्यांची बाबर मूठभर सैन्य घेऊन आला ही कविता इतिहासावर आणि भारतीय मनोवृत्तीवर वेगळा प्रकाश टाकणारी आहे. तसेच ऐहिक वृत्तीपुढे पारलौकिकात रमणार्यांचे तत्त्वाज्ञाने कसे पराभूत होते यांचीही जाणीव येथे होते. विशेष म्हणजे असा अनुभव प्रकट करणार्या त्यांच्या कविता उपहास, उपरोधाने अधिकच प्रत्यकारी होऊन जातात.
बाबर मूठभर सैन्य घेऊन आला तेव्हा
अग्नेयास्त्र, पर्जन्यास्त्र, वरूणास्त्र
वज्र, सुदर्शन या सगळ्या दंतकथांचं गाठोडं
कोणत्या शमी वृक्षावर ठेवलं होतं आम्ही ?
.....................
यदा यदाही धर्मस्य
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि....
गाढवं गाढवांपुढं गीता वाचत राहिली
नुसताच कडबा, नुसतंच रवंथ
.....................
जेव्हा बाबार मूठभर सैन्य घेऊन आला.
येथे भारतीय साहित्यातील संदर्भांचा खुबीने वापर केला आहे हेही लक्षात येते. किंबहुना त्यामुळेच ही कविता बहुपरिणामी, बहुस्तरीय आणि बहुसंदर्भसूचक होऊन जाते.
कुठल्याही समाजाचा इतिहास जसा त्या समाजावर परिणाम करीत असतो. (म्हणूनच इतिहासाचा अन्वयार्थ लावणे महत्वाचे असते.) त्याप्रमाणेच भोवतीचे राजकारणही महत्त्वाचे असते. आजचे राजकारण म्हणजे उद्याचा इतिहास असतो. म्हणून भोवतीच्या राजकारणावरती, त्यामधील अंत:प्रवहांवरती लक्ष ठेवणे आवश्यक असते. आजचे राजकारण मूल्यविहीन, अर्थधिष्ठित आणि व्यक्तीकेंद्रित झाले आहे. परिणामत: सामान्यांच्या जीवनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. समाान्य माणसे संभ्रमित झालेली आहेत. म्हणूनच भोवीतीच्या राजकारणाचा अन्वयार्थ लावणे अरूण इंगावले यांना फार महत्वाचे वाटते. हा अन्वयार्थ लवताना ते व्यथित होता. ही व्यथा कधी उपहासाच्या रूपात, तर कधी उपरोधाच्या रूपात व्यक्त होते. या सुंदर्भात त्यांच्या दोन कविता फार महत्वाच्या आहेत. म. गांधी आणि उॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकाचे नायक. त्यांनी स्वातंत्र्यासाठी आणि सामाजिक समतेसाठी सर्वस्व पणाला लावले. एक स्वतंत्र तत्त्वज्ञान उभारले. या तत्वज्ञानाच्या प्रकाशात पुढील पिढ्यांनी चालावे ही सहज स्वाभाविक अपेक्षा. पण आजच्या बाजाराधिष्ठित संस्कृतीमध्ये त्यांचाही त्यांच्याव अनुयायांनी बाजार मांडला आहे. हे वास्तव कवी फार धीटपणाने मांडतो.
पुढे ढकललं जातयं प्रत्येक युद्ध
वायफळ बोंलत फिरतात तुझे मुकनायक
पाळीव मांजरानाच पॅथर म्हटलं जातं हल्ली
तुझा लढासुद्धा पाण्यात गेला
मिनरल वॉटर पिऊ लागल्यापासून
चवदार तळ्याचा पत्ताच विसरलेत बिचारे
(महामानव)
या कवितेत जशी बाबासाहेबांच्या विचारांची शोकांतिका आणि दलित चळवळीची झालेली दुर्दशा व्यक्त होते, तशीच महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाची वसालात कशी लावण्यात आली त्याचंही अस्वस्थ चित्रण अॅण्डीक म्हतारा या या कवितेत कवी करतो.
मात्र तुझे पाऊलठसे असणार्या वाटा अनवटच राहिल्या
अनुयांना पेलल्या नाहीत
विरोधकांना पचल्या नाहीत
उपोषण, आत्मक्लेष आणि अहिंसा यांनी
तुझ्याबरोबरच हे राम म्हटलं.....
सध्या महापूरषांचे पुतळे उभारण्याची स्पर्धा लागली आहे. त्यातून हिणकस राजकारणण आकाराला येत आहे. तसेच आर्थिक घोटाळेही महापुरूषांच्या नावाने होत आहेत. या सार्याच व्यथित करणार्या वास्तवाचा वेध त्यांनी सावली या कवितेतून घेतला आहे.
मागच्या जयंतीचा हार काढीत चला,
नव्या जयंतीच्या टवटवीत हार घालण्यापूर्वी
आणि शिडी फिरती ठेवा हार घालण्यासाठी
उत्तरायन- दक्षिणायन सांभाळून सूर्या सन्मुख हार घाला
तुमची सावली पडू देऊ नका त्या पुतळ्यावर....
महापरूषांच्या बाबतच्या या अनुभवासोबतचे त्यांचं चिंतनसुद्धा अस्वस्थ करणारं आहे. विमान घोंघावतं तेव्हा यया कवितेत त्यांनी तुकारामाचा मनोमन अनुग्रह घेतलेला असावा. आणि मग त्यांच्यातलं कवीपण पानपानांत दृगोचर होत जातं. तुकाराम पुन्हा अवतारावा अशी आशा ते व्यक्त करतात
डोक्यावर विमान घोंघावतं तेव्हा
मी पहात राहातो आशेने
तू हातबीत दाखवशील म्हणून
वाटत राहातं स्वर्गसुखाला कंटाळून परत येशील
गाथेच्या आठवणीने व्याकूळ होऊन....
इथला धारदार उपहायस कवितेला अर्थगर्भता प्राप्त करून देतो.
वस्ती, बोनसाय यासारख्या कविताही आजच्या राजकीय जीवनाचे ओंगळवण प्रकट करीत जाणार्या आहेत.
कुठल्याही कालखंडात धर्म स्पष्टपणे एक भूमिका बजावीत असतो पुषकळदा तो मानवमुक्तीच्या आडच येतो . म्हणून जागतील सार्या सामाजिक समानतेच्या चळवळी धर्माशी संघर्ष करीत करीतच उभ्या राहिल्या. प्रारंभी विज्ञानाला मुख्यत: धर्माशीच भांडावे लागले. कारण धर्म नावाची गोष्ट सर्वव्यापी असते. ती माणसाच्या स्वातंत्र्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा संकोच करते. याचा अर्थ असा की, धर्म नेहमी प्रस्थापित व्यवस्थेच्या सोबत असतो. प्रस्थापित व्यवस्थेचे जे लाभार्थी असतात, त्यांच्या बाजूने असतो. मानवी सौख्यासाठी निर्माण झालेला धर्म अंतिमत: प्रस्थापित व्यवस्थेच्या ताटाखालचे मांजर होतो. आणि बहुसंख्यांकांना दु:खाच्या खाईत लाटेणारा ठरतो. म्हणूनच ज्यांना समाजाबद्दल काही सांगायचे असते, त्यांना धर्माबद्दल बोलावेच लागते. अर्थात धर्माबद्दल धीटपणे बोलणासरे लेखक, कवी फारच दुर्मीळ असतात. पुष्कळ प्रस्थापित आणि लोकप्रय लेखक प्रस्थापित व्यवस्था आणि धर्म यांच्याशी तडाजोड करतात. पण ज्यांना खरी आच असते ते धर्माच्या विरोधी ठाम उभे रहातात. अरूण इंगवले हे अशाा अपवादात्मक कवी, लेखकांपैकीच एक आहेत. त्यांनी फार धीटपणे आणि प्रत्येयकारी रितीने धर्मातील शोषणाच्या जागा दाखविल्या आहेत. कोणाचाही भिाडमुर्वत न ठैवता सत्य सांगण्याची हिंमत हा त्यांच्या कवितेचा गुण अधोरोखित करावा असा आहे. लांगूलचालन आणि बोटचेपेपणा न करता अरूण इंगवले यांची कविता निमिर्भडपणे सत्य मांडीत राहाते. त्यांची आशा प्रकारची कविता आपल्याला अंतर्मुख करते, जीवनासंबंधी नवे भान देते. म्हणूनच असा कसाला उतरणारा सच्चा कवी म्हणून अरूण इंगवले यांच्याकडे नक्कीच पाहाता येईल.
धर्म हा व्यवस्थेचा समर्थक असतो., हे तर खरेच पण प्रत्येक काळात त्याचे स्वरूप बदलते. मध्ययुगात त्याची सामंतशाहीशी हातमिळवणी होती. आजच्या प्रछन्न भांडवलदारी युगात त्याचे स्वरूप स्वार्थासाठी राबविले जाणारे असे झाले आहे. श्रीमंतांच्या दिखाऊपणाला साह्य करणारे झाले आहे. त्यामुळे आजचे धर्माचे स्वरूप भ्रष्ट, हिंडीस आणि धर्मभावनेच्या आधारे सामान्यांचे शोषण करणारे झाले आहे. या संग्रहात जवह जवह सिेक कविता देव धर्माचे भ्रष्ट्र स्वरूप प्रकट करणार्या आहेत. उपदेशाचा किंवा संदेशाचा आव न आणताही तटस्थपणे समाजव्यवस्थेचा काढलेला आलेख वाचकाला किती अस्वस्थ करू शकतो त्याचं उदाहरण म्हणून या कवितांकडे पाहाता येईल. या कतिवा अर्थातच आपणाला अंतर्मुख करतात. आत्मचिंतनाला प्रवृत्त करतात. मला वाटते कुठल्याही चांगल्या कवीचे हेच कार्य असते !
इंगवलेंच्या एकंदर कवितेलाच तत्वचिंतनाची सखोलता आहे. म्हणूनच सस्नेह भेट ही विषल प्रेमावर भाष्य करणारी एकमेव कविताही यातून सुटत नाही. प्रेयसीला देण्यासाठी म्हणून जपून ठेवलेल्या कविता संग्रहाच्या पहिल्या फिकुटलेल्या नावासंबंधी भाष्य करतातना कवी म्हणतो.
पिवळट पानं पडलेला संग्रह तुझ्या हातात पडलाच
तर खुपच फिकुटलेलं दिसल तुझं नाव
तो अभावितपणे फिरलेल्लया माण्या बोटांचा प्रताप
वारकर्यांच्या श्रद्धायुक्त स्पर्शाने विठोबाच्या पायांच तेच झालं
श्री वि÷ठलन हे महाराष्ट्रातील लाखो वारकर्यांचे श्रद्धास्थान. वारकर्यांबरोबरच इतरही लोक पंढरपूरला जाता. परंतु विठ्ठल मात्र तेथे जमणार्या गर्दीत खरा भक्त शोधत असतो. ते थे मात्र नवस - सायास, देणग्या, दक्षिणा आणि बुका टिळा यांनीच गर्दी असते. म्हणूनच कवी म्हणतो,
देणग्या दक्षिणांमध्ये गुंतायला
तो बडवा थोडाच आहे ?
गर्दी, गरमी, गलक्याच्या गच्चा गाभार्यात
तरीही तो उभा आहे,
ज्ञान्या, चोख्या, नाम्या, तुक्या, बंक्या
यांचा वारसदार आलाच तर, अपलं
हजर असावं म्हणून
(अठ्ठावीस युगांचं रहस्य)
एका कवितेत तर पंढरपूरच्या तीर्थकुंडात बडव्याने लघवी केली आणि तेच तीर्थ म्हणून भक्तांनी प्राशन केले असा उद्धीग्न करणारा संदर्भ येऊन जातो. देव धर्माला किती विकृत रूप आले आहे., हेच येथे कवी सांगतो आहे.
देवाचं प्रेत सारख्या कवितेतून देवाचं अस्तित्वच कवी नाकारत जातो, तर अहं ब्रह्मस्मि सारख्या कवितेतून देव कल्पनेच्या मागे असणार्या संकल्पनेची खिल्ली उडवितो. तुम्ही धर्म माना अथवा न माना, त्याच्या खोड्यातून माणसाची सुटका होत नाही. अशी एक हतबलतेची जाणीव त्यांच्या धर्म या कवितेतून होत जाते. धर्म म्हणजे मंदिर किंवा चर्च किंवा मशीद नव्हे आणि त्यामुळेच तर दंगली होतात., हे वास्तवही कवीला अस्वस्थ करून जाते. तरीही धर्ममार्तंड धर्म पटविण्याचा परोपरीने प्रशयत्न करीतच राहतात. ते गोब्लसचे तंत्र वापरून असंख्य गोष्टी समोरच्यांच्या मेंदूत घुसविण्याचा प्रयत्न करतात.
कपोलकल्पित ग्रंळातला चौथा
जो तो रवंथित राहातो आपल्या मगदूराप्रमाणे
पोटभरू प्रवचनकार करीत राहतात
संस्कृतीच्या समृद्धीचा पानं वचावचा
अध्यात्माचा भुसा कांडला जातो कथाकीर्तनांमधून
धर्माची कफनी घालून
(धर्म)
देव आणि धर्म यांच्या समर्थनार्थ असंख्य कथा आणि मिथके निर्माण झाली. ही मिथके केवळ मिथके म्हणून उरत नाहीत. ती प्रत्यक्ष जीवनात नीतिमूल्यांचे पाठ केवळ मिथके म्हणून उरत नाहीत. ती प्रत्यक्ष जीवनात नीतिमूल्यांचे पाठ म्हणून रूजू होत असतात आणि खरा प्रश्न तिथेच निर्माण होतो. हे पाठ मग स्वाभाविकच जीवनाला विकृत करतात. अनैसर्गिक बाबींना नैसर्गिक म्हणून रूढ करू पाहतात. मग प्रत्यक्ष जीवनात स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी येते. दलितांच्या शिक्षणावर संक्रांत येते. परंतु या विरूद्ध जेव्हा बंड होते, तेव्हा धर्म बुडत चालल्याची हाकाटी पिटली जाते.
उपरोधाचा फार प्रभावी वापर इंगवले यांच्या कवितेत दिसतो. विसंगती अचूक टिपून त्यांची उपरोधिक मांडणी करणे हा चांगल्या साहित्याचा गुणविशेष असतो. येथील उपरोध कवितेला अधिक प्रत्ययकारी करून जातो, हेही आपल्या लक्षात येते. याच संदभर्ज्ञत रामराज्याच्या भाटांनो ही कविताही अगदी लक्षणीय आहे.
दंडकारण्याचे सातबारा होतील घुसखोरांच्या नावे
सगळं रामरायण घडल्यानंतर
परटाची कुजबूज प्रमाण मानणार्या
हलक्या कानांशी कसा संसार कराचा सीतेने ?
परस्त्रीला सन्मानानं वागवणारं
अशोकवन डवरून यायला हवं असेल तर
रावणराजच वाचायला हवं
धर्माला आलेले दिखाऊपणाचे स्वरूप (सत्येनारायण) कवीला अस्वस्थ करून जाते. एकंदरीत धर्म आणि देव या बाबी स्वाभाविकळपणेच, माणसाला नैसर्गिक जगणे जगू देत नाहीत. स्वातंत्र्याचा मोकळा वारा पिऊ देत नासहीत. व्यक्तीचा विकास होऊ देत नाहीत. किंबहुना मुख्य म्हणजे माणसाचे माणूसपणच संपवून टाकतात. नव्या युगाची मूल्ये रूजूच दीेत नाहीत. म्हणून देवाची तिरडी आवळली पाहिजे असे कवीला वाटते.
मला हवेत चार महामानव
धमार्र्चा पत्ता माहिती नसणारे
माणूस म्हणून जगणारे
माणूस म्हणून जगणारे
तिरडी उचलीन म्हणतो सगळ्या म्हातार्या धर्माची
मी मडकं धरून पुढं चालेन
त्यांनी खांद घालायची तयारी ठेवली तर
(खांदेकरी)
याचा अर्थ असा की, मानवी जीवनाला उन्नत करणारी मूल्ये की देव-धर्म असा प्रश्न आला तर कवी मानवी जीवनाला उन्नत करणार्या धर्माच्या बाजूने उभा राहू इच्छितो. ही कवीच्या नितळपणाची खूण आहे.
जागतिकीरण असो किंवा कोणतीही व्यवस्था असो, संवेदनशील माणसाने धर्माबद्दल बोललेच पाहिजे. कारण धर्म नावाची गोष्टी जीवनाला असंख्य ठिकाणी विद्रूप करीत असते.
धर्माबद्दल बोलण्याच्याही दोन रिती असतात. एक म्हणजे त्याला मुकाटपणे समोरे जाणे. असे बहुसंख्य कवी लेखक करीत असतात. पण शोधक असणारा माणूस प्रस्थपित कल्पनांना शरण जाऊ इच्छित नाही. कारण सत्य काही निराळेच असते. असा सत्यान्वेषी माणूस धर्माचे शोषण प्रकट करीत राहातो. प्रस्थापित संकल्पनांच्या विरोधात बंड करून उठतो. या संग्रहातल्या अनेक कवितांमध्ये ही बंडखोरी प्रत्यही जाणवत राहतो. प्रस्थापित व्यवस्थेविरूद्ध बंड करण्याचं मानसिक सामर्थ्य या कवीजवळ आहे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियेले नाही बहुमता । हा तुकारामी बाणाही आहे. या दृष्टीने झळ, राखण्या, भिकारी, आमचं पंचकोनी कुटुंब , देवाचा संसर्ग, दशावतार, पडीचं ढोर या कविता अत्येंत महत्त्वाच्या आहेत.
भारतामध्ये धर्म तर आहेतच, पण धमांनी वैश्अिलेल्या जातीही आहेत. जात आणि लोकशाही एकत्र राहूच शकत नाहीत. जातीच्या बंधनात जखडलेल्यांना स्वातंत्र्याचे आणि समतेचे आकाश दिसूच शकत नाही. तरीही माणसं जाती आणि पोअजाती सोडायलाच तयार नाहीत. च्या मायला उत्क्रांतीच्या या कवितेत हीच हतबलता व्यक्त होते. या जातींनी आपल्याला केवढे व्यापून टाकले आहे. याची जाणीव त्यांच्या जात या कवितेतूनच व्यक्त होते.
जात रूजत घातली गेली नसेल ना गर्भाशयात ?
तर मग ती जन्माबाधीच चिकटली असेल पिंडाला
आणि चिकटून राहाणार पिंडाला कावळा शिवल्यानंतरही।
ती नाही गाडली जाणार कबरीत
किंवा जाळली जाणार चितेत
ती देहानंतरही वावरत राहाणार भूतासारखी
आणि पुनर्जन्म घेत राहाणार वारस तपासात...
अशी ही जात संविधानालाही पोखरून टाकते हे कवीचे खरे दु:ख आहे.
रानाच्या एकात्ममतेची प्रतिज्ञाा म्हणणासरं संविधान
वडाची साल पिंपळाला लावीत बसलंय
(वडाची साल पिंपळाला)
म्हणून या जात, धर्म आणि देव संकल्पनांशी लढण्यासाठी नेहमीची शास्त्रे उपयोगाचवी नाहीत. तर आपण जी शस्त्रे वापरतो आहोत तीच शस्त्रे तपासून घ्यायला हवीत असे कवीला वाटते.
देव, धर्म, जात, इतिहासाचा अन्वयार्थ या आणि अशा सारख्या अनुभवांना जेव्हा अरूण इंगवले सामोरे जातात, तेव्हा त्यांची कविता आपोआपच वैचारिक प्रांतात प्रवेश करते. आणि एका भावकवीचे रूपांतर चिंतनशिल कवीमध्ये होऊन जाते. त्यांची कविता वैचारिक चिंतनगर्भ कविता होऊन जाते. पुष्कळदा अशा प्रकारची कविता गद्यप्राय होऊन जाते. तेथे वक्तृत्वाचा बडिवार सुरू होतो. परंतू आनंदाची गोष्ट अशी की, अरूण इंगवले यांची कविता आपले कवितापण हरवत नाही. विचार देणारी कविता बद्य आणि रूक्ष हो%न जाते. मात्र इंगवले यांच्या कवितेवर असे दोषरोपण करायला किंचिंतही वाव उरत नाही. काव्शय गुण जपताना मोजक्या शब्दात प्रचंड पट उलगडण्याची ताकदसुद्धा या कवितेत आढहते. त्याचे कारण म्हणजे तिचे अल्पाक्षरात्व, खूप काही सुचविण्याची क्षमता. आणि आंतरिक उर्मी हेच आहे. त्यातूनच ती प्रतिहमा प्रतिकांच्या भाषेत व्यक्त होत जाते. उदा धर्म या कवितेतल्या या ओळी पहा -
मी शोधित राहातो धर्म
कर्मकांडाच्या उकिरड्यावर
मी पाखडीत राहातो,
चाळणी मारतो
आणि तपाशित राहातो त्यांच्या कफनीचे खिसे
येथे धर्माबद्दल कविला काय वाटते ते तो उकिरडा, पाखडणे, चाळणी, आणि कफनी या प्रतिमांमधूनच साकारीत जातो. या सार्याच प्रतिमा अनेक अर्थांने सूचन करणार्या तर आहेच, पण अतिशय अर्थपूर्णही आहेत. या द्द्ष्टीने ही सारीच कविता तपासून पाहाता येऊ शकेल.
देव, धर्म, जात, इतिहासाचा अन्वयार्थ या आणि अशा सारख्या अनुभवांना जेव्हा अरूण इंगवले सामोरे जातात, तेव्हा त्यांची कविता आपोआपच वैचारिक प्रांतात प्रवेश करते. आणि एका भावकवीचे रूपांतर चिंतनशील कवीमध्ये होऊन जाते. त्यांची कविता वैचारिक चिंतनगर्भ कविता होऊन जाते. पुष्कळदा अशा प्रकारची कविता गद्यप्राय होऊन जाते. तेथे वक्तृत्वाचा बडिवार सुरू होतो. परंतु आनंदाी गोष्ट अशी की, अरूण इंगवले यांची कविता आपले कवितापण हरवत नाही. विचार देणारी कविता गद्य आणि रूक्ष होऊन जाते. मात्र इंगवले यांच्या कवितेवर असे दोषारोप करायला किंचितही वाव उरत नाही. काव्यगुण जपतानाच मोजक्या शब्दात प्रचंड पट उलगडण्याची ताकदसुद्धा या कवितेत आढळते. त्याचे कारण म्णजे तिचे अल्पारक्षरत्व, खूप काही सुचविण्याची क्षमता आणि आंतरिक उर्मी हेच आहे. त्यातूनच ती प्रतिमा प्रतिकांच्या भाषेत व्यक्त होत जाते. उदा धर्म या कवितेतल्या या ओळी पहा -
मी शोधित राहातो धर्म
कर्मकांडाच्या उकिरडाव्यावर
मी पाखडीत राहातो,
चाळणी मारतो
आणि तपाशीत रहातो त्यांच्या कफनीचे खिसे
येथे धर्माबद्दल कवीला काय वाअते ते तो उकिरडा, पाखडणे, चाळणी आणि कफनी या प्रतिमांमधूनच साकारीत जातो. या सार्याच प्रतिमा अनेक अर्थांचे सूचन करणार्या तर आहेतच, पण अतिशय अर्थपूर्णही आहेत. या दृष्टीने ही सारीच कविता तपासून पाहाता येऊ शकेल.
अरूण इंगवले यांच्या कवितांचे आणखी एक वैहशिष्÷य नोंदविले पाहिजे आणि ते म्हणजे त्यांच्या कवितेत पुष्कळदा चाकोरीबाहेरचे, काहीसे आगळे वेगळे अनुभव येतात. ज्यांना अनकॉमन म्हणतात येईल असे ते अनुभव असतात. तसे तर प्रत्येक कवीचेच स्वत:चे असे एक वेगहे निरीक्षण असते. अर्थात या वेगळ्या निरीक्षणाच्या आधारेच प्रत्येक कवी दुसर्या कवीपासून वेगळा होत असतो. येथे अरूण इंगवले यांच्या अनकॉमन निरीक्षणाची नोंद करता येईल. चौकटी बाहेरचे शब्द, चौकटीबाहेरची मांडणी आणि चौकटी बाहेरचे अनुभवविश्व ही कविता मांडीत राहातो. त्यांच्या बें ..... बें ..., फामली, लक्ष्मणरेषा, कोंळिष्टक, काळोख, धगदार भाषा, समृद्ध परंपरा यासारख्या कवितांची या संदर्भात नोंद करता येईल. एखाद्या घटनेला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या कविताही याच सदरात मोउतील.% रातोरात कोंबडा नाहीसा होतो आणि शेजारच्या घरी आलेल्या पाहुण्यांच्या पोटात तो गेलेला आहे काय ही शंका येथे व्यक्त होते. ही घअना कवी एक वेगळ्याच संदर्भात वापरताना दिसतो.
राजकारणाच्या उकिरड्यावर
घटनादत्त विचारस्वातंत्र्याची गर्जना करीत
छाती काढून ताठ उभा राहाणारा सोमा भुवड
रातरोत नाहीसा झाला
तशातलीच गत
इथे सोमा भुवड आणि तुरेंबाज कोंबडा हितसंबधियांच्या दृष्टीने सारखाच असतो, हे किती तटस्थपणे सांगितले आहे. या तटस्थपणामुळेच ही कविता आणि कवीचे वेगळे निरीक्षण लक्षात राहून जाते.
कौटुंबिक आणि एकूणच मानवी नातेसंबंधाचा शोध घेणारी ही कविता लक्षणीय आहे. त्यांची पदराचं शीड केलंस म्हणुन या कवितेचा विशेष उल्लेख करावा लागेल. सवत्:ची पत्नी मराठी कवींच्या कवितूतून सहसा डोकावत नाही. येि मात्र कवीने पत्नीच्या कर्तृत्वाचा मोठ्या कृतज्ञतेने वेध घेतला आहे.
भोवतीचे विपरीत वास्तव पाहून, धर्माचे भ्रश्ट रूप पाहून, जातीची छळणूक पाहून आणि इतिहासातली बहुजनांची कुंचंबणा पाहून कवी अंतर्मुख होतो ही अंतर्मुखता आत्मचिंतनाकडे घेऊन जाते. हे आत्मचिंतन मग स्वत:च्या व्यक्तिमत्त्वासंबंधी असते, समाजासंबंधी असते तर कधी एकूणच मानवी जीवन व्यवहारातील अतर्क्यपणासंबंधीही असते. एकंदर काय की, त्यांची आत्मचिंतनपर कविता त्यांच्या कवितेची उंची वाढवते यात मात्र काहीच शंका नाही. जीवनाच्या अतर्क्यासंबंधीची त्यांची ही कविता पहा -
गर्दी विसरत चाललेय स्व:चा लॉग इन आयडी
कोणालाच आठवत नाही जगण्याचा पासवर्ड
उत्क्रांत होत सेल्फीपर्यंत येऊन पोहोचलं एकाकीपण
घरोघरी मातीच्याच चुली
ही म्हण किती लवकर आऊटडेटेड झाली नाही ?
फोर जी च्या सुपरसॉनिक वेगात.
मात्र शेषाच्या फण्यावरून पृथ्वी घरंगळण्याची भिती
फणा काढतेय आहे अधून मधून
(आबूट घेर्यातला सूर्य)
कधी कधी हा साराच जीवनव्यवहार कशासाठी हा मुलीूत असा प्रश्न कवीला पडतो. आज ना उद्या बकरी मरणारच असते, तरीही ती का पाला खात राहते ? माणसंही शेवटी मरणाधीनच होणार आहेत, तर स्वार्थाचा सारा बाजार कशासाठी हा प्रश्न कवी बकरी च्या निमित्तानं उभा करतो.
का ओथंबत राहाते बकरी दोन पायांवर
शेंड्याचं लुसलुशीत कोंब
जिभेच्या टप्प्यात आणण्यासाठी
..............
स्थिपप्रज्ञत्व रवंथताना दिसेल बकरी
नंतर हुकावर उलटं टांगलं जाईल,
एक सोलीव असत्य
खोटे वृषण लावलेलं.
एकूण जीवनाच्या अतर्क्यतेसंबंधी आणि वृथा मानवी व्यवहारासंबंधी कवी जसा चिंतनशील होतो, त्याप्रमाणे एकूण समाजाच्या विपरीततेकडे पाहूनही काहीएक चिंतन प्रकट करीत जातो. पसायदान या कवितेत संत ज्ञानेश्वरांशी साधलेला संवाद समाजचिंतनाच्या दृष्टीने अतिशय मोलाचा आहे.
तू पैठणवरून आलेल्या शुद्धीपत्राची जाडपताळणी व्हावी हा त्यांचा आग्रह माऊले !
तुझं तत्त्वज्ञान लाल फडक्यात गुंडाळणे हेच अधिक व्यवहार्य
तू चालवलेली भिंत आणि तुझा रेडा
इतकंच पुरे आम्हाला तुझ्या जयघोषासाठी......
कधी कधी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वासंबंधीही कवी चिंतन करीत राहातो. जन्मांधपण या कवितेत कवी म्हणतो.
भूतभविष्याचा हात सोडून
वर्तमान तुझाच झालोय मी
किती छान असतं नाही
हे डोळस जन्मांधपण
असेच स्वत:च्या व्यक्तिमत्त्वासंबंधीचे चिंतन त्यांच्या अस्वस्थ येरझारा, आईचं गर्भाशय या कवितांमधून काव्यात्म रितीने प्रकट होते.
एकंदरीत चिंतनशीलता हा अरूण इंगवले यांच्या कवितेचा मुख्य धर्म आहे. तो सर्व ठिकाणी जावणतोच, पण वर दर्शविलेल्या तीन ठिकाणी अधिक्याने जाणवतो. एकाकी वाटू लागल्यावर, सावली, मागं लागलेलं जगणं, शून्य उजाडू नये, शब्द फुटत नाहीत, अर्थगर्भ मौन या आणखी काही कविता त्यांच्या चिंतनशीलतेच्या संदर्भात नोंदविता येतील.
प्रच्छन्न भांडवलदारी व्यवस्थेच्या कराल दाढांखाली सापडलेला सामान्य कष्टकरी समाज, जाती आणि धर्माने त्याचे केलेले मानसिक खच्चीकरणख, इतिहासाने त्यात घातलेली भर आणि भोवतीच्या स्वार्थपरायण हितसंबंधी गटांमुळे सामान्य माणूस भोवंडून गेला आहे. सामान्य माणसाची ही व्यवस्था पाहून कवी अवस्था होतो. कविता लिहीत रहातो. शेवटी त्याला कवितेशिवाय दुसरा कुठला आधार आहे ? तो कवितेच्या आश्रयाला येतो आणि कविता निर्मितीचाच अनुभव शब्दब्द्ध करीत रहातो. कान्यनिर्मीती आणि काव्यविश्व केंद्रस्थानी असणार्या अनेक कविता कवी लिहीत जातो.
आत्महत्या केलेल्या कवितेच्या खिशात
सापडतात म्हणे माझ्या नाव पत्याचे विठोरे
मी नाही नाकारू शकत
कवितेचा चेहरा माझ्या वळणावर असणे .....
(आडव्या पिंडाची वेदना)
भोवतीच्या अभावांची नोंद करणारी काव्यविषयक कविता म्हणून साहित्याची जात या कवितेचा उल्लेख करता येईल.
माफ करा पूर्वसुरींनो
तुमची तलम मुलायम गाणी
अवर्षणग्रस्त मातीत उगवतच नाहीत हाल्ली
.......
तसाच उपडा पडून राहूद्यात साहित्याच्या दारकसीवर
माझ्या स्वागतासाठीचा बहिरा कप
जातीपातीविरूद्ध आवाज उठविणारी माझी कविता
कशाला लाचारी करील कोणत्यातरी
साहित्याच्या जातीत सामावून जाण्याची
वरील दोन कविता केवळ उदाहरण म्हणून उद्धृ केल्या आहेत. अस्वस्थ येरझारा, तमांध उजेड, कविता लिहिण्यासारखा, झिलकारी, माझी समंजस कविता, कवितेची शेपटी, मृत्यूपत्र, कवी, कविता, बायको, ज्ञानेश्वरी आणि माझी कविता यासारख्या आणखी काही कवितांचा या संदर्भात उल्लेख करता येईल.
अरूण इंगवले यांचा हा दुसरा कविता संग्रह. यापूर्वीचा आवर्त हा कवितासंग्रह मुख्यत: गेय कविता असलेला असा आहे. मात्र या कवितासंग्रहात एकही गेय कविता असलेला असा आहे. मात्र या कवितासंग्रहात एकही गेय कविता नाही. त्यांच्या शब्दातून व्यक्त झालेल्या फटकळ, रांगड्या आशयाशी मुक्तछंदाचाच आकृतीबंध अधिक जवळचस आसहे. साहित्याची जात या त्यांच्या कवितेतून त्यांची मुक्तछंदाविषयीची भूमिका नकळतपणे स्पश्ट झाली आहे. आणि या अचूक आकफतिबंणामुळेच आवर्त मध्ये जो जीवनानुभव आलेला आहे, तो इि अधिक विकसित झाला आहे. अधिक धारदार होऊन आला आहे. म्हणून वाचकांच्या मनात घर करून राहातो. आत्मचिंतनाला प्रवृत्त करतो. अंतर्मुखही करतो मराठीमध्ये णका समर्थ कवीचा जन्म झाला आहे. याचीही जाणीव करून देतो.
अरूण इंगवले हे कोकणात रहातात. कोकणच्या भूमीत रूजलेले विशिष्ट असे शब्द, विशिष्ट असे अनुभव त्यांच्या कवितेत येतातच, परंतु ही कविता केवळ प्रादेशिक रहात नाही. त्या पलीकडे जाते. एकूण मराठी समाजाच्या व्याथावेदनांची होते आणि हेच तिचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे. मराठी साहित्यविश्वाने नोंद घ्यावी असा हा काव्यसंग्रह इंगवले यांच्या चिंतनशील लेखणीतून अवतरतो आहे, ही सुखद घटना आहे.
अरूण इंगवले यांच्या पुढील कवितांबद्दल उत्सुकता आहेच. त्यांना शुभेच्छा.
- नागनाथ कोत्तापल्ले