श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची ओळख

 लेखिका :- सौ. सुरेखा  राजेंद्र हाडके (शिरवळ)

     संताना जात नसते. संताचे कार्य मानव जातीसाठी असते. संत संताजी महाराज हे एक महान संत होऊन गेले समाज सुधारणेचे काम ही त्यांनी त्याचप्रमाणे केले हे सर्व आपणास माहितच आहे.

     संत तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावुन सर्व कार्य त्यांनी केले. व महाराष्ट्रातील तेली समाज घडविला.

     संताजी महाराजांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ मध्ये झाला. आजोबा भिवाशेठ जगनाडे, वडील विठोबाशेठ व आई सुंदुंबरे येथील काळे घराण्यातील मथुबाई. संताजीचे शिक्षण लिहीता वाचता येणे व हिशोब ठेवणे यापुरतेच होते. घरची परिस्थिती तशी चांगली होती. त्यामुळे संताजीला कमतरता कसलीच भासली नाही. वयाच्या १० व्या वर्षीच वडिलांनी संताजीला तेल धंद्याचा परिचय करूण दिला. व लग्नही ११ व्या वर्षीच खेड येथील कहाणे घराण्यातील, यमुनाबाई बरोबर झाले.  यमुना वयाने फारच लहान होती. संसार म्हणजे काय ? याचे दोघांनाही ज्ञान नव्हते. त्या काळात बालविवाह पद्धत समाजात रूढ होती. संताजी महाराजांची व तुकाराम महाराजांची भेट शके १५६२ मध्ये म्हणजेच जानेवारी १६४० मध्ये झाली. तुकोबाच्या पहिल्या पत्नीला म्हणजेच रखमाबाईला संतु नावाचा मुलगा झाला. तो दिडदोन वर्षातच वारला. रखमाबाई सुद्धा दम्याच्या दिर्घ आजाराने वारल्या. संताजीला किर्तनात पहाताच तुकारामाना आपल्या पुत्राची आठवण झाली. त्यांच्या मुलाचे नावही संतु असल्या कारणाने. त्यांना संताजी बद्दल प्रेम, आपुलकी निर्माण झाली. त्यामुळे महाराजांनी संताजीला आपल्या सानिध्यात ठेवले.

     तुकाराम महाराजांचे लेखक म्हणुन संताजी महाराजचें लेख व भजने आढळुन येतात. वास्तवीक पहाता तुकाराम महाराजांना अशा प्रकारच्या लेखनिकाची गरज होती असे नव्हते ते स्वत: उत्तम प्रकारे लिहु व वाचु शकत होते परंतु किर्तन प्रसंगी त्याच्‍या तोंडुन निघणारे शिघ्रकाव्य व नविन अभंग संताजी लिहुन ठेवत असत.

     संताजीने तुकाराम महाराजांना गुरूस्थानी मानले होते. आणि त्यांच्यामुळेच तुकाराम महाराजांचा अनमोल साहित्याचा साठा आज आपल्याला मिळाला आहे. संताजीचे अक्षर फारच संदर होते. तुकारामाचे नविन नविन अभंग ते आपल्या वहित लिहुन ठेवत असे. हजारो अभंग त्यांनी संग्रहीत करूण ठेवले आहेत.  तुकाराम महाराजांचा महिमा लोकांना केवळ संताजी महाराजांमुळेच समजला त्याला इतिहास साक्ष आहे. त्यांची स्मरण शक्ती खरोखरच वाखणण्यासारखी होती. त्यांनी स्वत: रचलेले घाण्याचे अभंग आजही बर्‍याच ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागातुनएैकावयास मिळतात. अगदी तरूण असतानाच संताजी महाराजांना तुकारात महाराजांचे किर्तन एैकण्यास मिळाले. आणि तेव्हापासुन त्यांना किर्तनाची ओढ निर्माण झाली व त्यातुनच ते तुकाराम महाराजांकडे आकर्रूीत झाले जसे काही तुकाराम महाराजांशी त्यांचे पुर्वजन्मीचे नातेच होते.

santaji maharaj jagnade

     तुकारामची गाथा संताजी महाराजांच्या कठोर परिश्रमामुळे जिवंत राहु शकली . तुकाराम महाराजांचा नियमीत सहवास व मार्ग दर्शनामुळे संताजीची जडण घडण व्यवस्थित झाली विशेष करूण मोगली आक्रमणाच्या वेळेला तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या व किर्तनाच्या आणि कवितांच्या वह्यांचे रक्षण संताजी महाराजांनी जिवाची पर्वा न करता केले.

     चाकणच्या किर्तनानंतर संताजी नेहमी सतत तुकाराम महाराजांच्या सहवासात राहू लागले तुकारामाचा सहवास सतत मिळत गेल्यामुळे तुकारामांच्या अभंगाचे लेखन रोज हो| लागले. महाराजांच्या सहवासाचा किर्तनाचा संताजीच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. व घराकडे आणि संसाराकडे दुर्लक्ष होऊ लागले. रोज होणार्‍या किर्तनातुन आणि अभंगातनू सामान्य माणसांच्या समस्येचे निवारण होत होते समस्येचे निवारण करण्यासाठी कोणी ब्राह्मणाकडे जात नव्हते. त्यामुळे ब्राह्मणांचे नुकसान होऊ लागले. त्यांना दक्षिणा मिळणे बंद झाले आणि त्याचा सर्व राग तुकाराम महाराजांवर निघाला तुकाराम महाराजांच्या विरोधात धर्मसभा घेऊन धार्मीक न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. व त्या ठिकाणी रामेश्वर भट स्वत: न्यायधीश म्हणुन काम पहात होते आणि त्यानी निर्णय दिला तो असा. तुकारामाला गाथा लिहण्याचा अधिकार नाही. कारण तो शुद्र आहे. किर्तन सांगणे व पाया पडुन घेण्याचा अधिकार नाही. त्याची संपत्ती जप्त करून गावातुन हाकलून द्या. आणि त्याच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाका. अशा प्रकारचा निकाल स्वत: रामेश्वर भटाने दिला. तुकारा महाराजांना बर्‍याच वेळा मारहाण झाली. त्याचे संताजी महाराज साक्षीदार आहेत. त्यांनी तुकाराम महाराजांना एकटे कधी सोडले नाही. संताजी महाराजांना सुद्धा बर्‍याच वेळा धमक्या देण्यात येत होत्या त्यांचेवर अनेक वेळ हल्लेही झालेले  आहेत. त्या तुक्याची सांगत सोउतो की नाही ? नाहीतर तु जिवंत रहाणार नाही. आणी तुझा तो तुक्याही ! तरीपण संताजी महाराज घाबरले नाहीत. रामेश्वर भटाने तुकोबारायांच्या गाथा इंद्रायणीत बुडविण्याचा निकाल तर दिलाच होताच. आयुष्यभर कष्ट करून अभंगाचे लिखाण केलेल्या सर्व वह्या धार्मीक दबावामुळे पाण्यात बुडविण्यात आल्या.

     संताजी महाराजांची पुढील तेरा दिवसात तहान - भुक हरपुन  आपल्या प्रबह स्मरणशक्तीच्या जोरावर पुन्हा अभंग लिहायला सुरूवात केली. सर्व अभंग, किर्तन पुन्हा जसेच्या तसे लिहुन काढले, गाथा इंद्रायणी नदीतुन कोरड्या वर आल्या पांडुरंग प्रसन्न झाला चमत्कार झाला अशा प्रकारचा प्रचार सर्वज्ञ करण्यात आला. परंतु स्थानीक लोकांना हे सर्व माहित होते. तुकाराम महाराजांच्या गाथेचे रक्षण संताजी महाराजांनी केल्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांना फार कौतुक वाटले, आणि त्यांच्या विषयी आदर, प्रेम, श्रद्धा निर्माण झाली. संताजी महाराजांनी दिलेले योगदान हे आपल्या समाजासाठी फार कौतुकास्पद आहे. त्यांचे मार्गदर्शन अभंगाच्या माध्यमातुन केलेले उपदेश आजही आपल्याला त्यांची आठवण करून दिल्या शिवाय रहात नाही.

     ते सांगायचे किर्ती शिल्लक राहिल असे काम करा. त्यासाठी आपल्याला मनुष्यजन्म मिळाला आहे. त्याचा उपयोग करा ! सावध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यांनो मृत्यु अटळ आहे. तो कोणत्याही क्षणी येईल. त्याला समोरे जा ! या जिवनाचा सदउपयोग करा. एकदा मनुष्य जन्म संपला की तो पुन्हा येणार नाही असा विचार संताजी महाराजांनी मांडला.

     त्यानंतर वयाच्या ७६ व्या वर्षी मार्गशिर्ष वद्य १३ ला संताजी महाराजांचे निधन झाले. निधनानंतरच्या निघालेल्या अंत्ययात्रेत भजनांच्या दिंड्या चालत होत्या. त्यांच्या देहावर हार, फुले, गुलाल, व पैशाची उधळण होत होती. विठ्ठल नामाच्या जयघोषात त्यांना निरोप देण्यात येत होता. स्थळाची शुद्धी करूण खड्डा खणुन त्यामध्ये बेलपत्रे, तुळशीपत्रे चंदन घालुन त्यावर मीठ घातले लाकडी पाटावर संताजी महाराजांचा मृतदेह बसविला नवे वस्त्र अंगावर घालुन पुजेचे साहित्य ठेवून गळ्यापर्यंतचा त्यांचा देह मिठाने झाकला. व आलेल्या सर्व भाविकांनी हरिनामाच्या गजरात त्यांच्यावर मुठमाती टाकली अशी बरीच माती टाकली तरी त्यंाचा चेहरा न बुझता उलट तेजस्वी दिसु लागला. परंतु बर्‍याच वेळाने काही लोकांच्या लक्षात आले की तुकाराम महाराजांनी संताजी महाराजांना वचन दिले होते की तुझ्या अंत्यसमयी तुला शेवटचे दर्शन देण्याकरिता व तुला माझ्या हस्ते मुठमाती देण्यासाठी मी जरूर येईल. अशा प्रकारचे बोलणे आठवल्यानंतर माती टाकणे बंद केले. पहाटे पहाटे प्रकाशाचा एक मोठा किरण चमकला आणि काही क्षणातच तुकाराम महाराज प्रगट झाले. आणि पांडुरंगाचा जयघोष करीत ते संताजी महाराजांच्या देहापाशी गेले. संताजी महाराजांच्या देहावर तीन मुठी माती टाकली आणि काय चमत्कार संताजी महाराजांचे शिरकमल पुर्ण झाकले गेले. पांडुरंग पांडुरंग म्हणत तुकाराम महाराज अदृश्य झाले पण जाते वेळेस त्यांनी संताजी महाराजांनबद्दल म्हंटले की.

 चारीता गोधन | माझे गंतले वचन ॥
 आम्हा येणे झाले |  एका तेलीया कारणे ॥
 तीन मुष्ठी मृतितका देख | तेव्हा लोपविले मुख ॥
 आलो म्हणे तुका | संतु न्याव्या विष्णु लोका ॥

             संताजी महाराज समाधिस्त झाल्यापासन चाकण, खेड, कडुस, पुणे शहर व महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन मार्गशिर्ष वद्य १३ ला. अनेक भावीक तेथे जातात. व सर्व ग्रामस्थांच्या मदतीने उत्सव साजरा करतात. त्यावेळी भजन किर्तन व प्रसादाच्या माध्यमातुन भोजनाचा कार्यक्रम ठेवला जातो.

     तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकर्‍यांपैकी संताजी महाराज हे एक असले तरी तुकारामाच्या खांद्याला खांदा लावुन बरेच कार्य संताजी महाराजांनी केलेले आहे. अनेक प्रकारच्या अभंगाची रचना त्यांनी केलेली आहे. संताजी हे भक्तीमार्गी होते हे यावरून सिद्ध होते.

     संताजी महाराज हे तुकाराम महाराजांच्या सानिध्यात सतत रहात असल्यामुळे त्यांनाही पांडुरंगाचा साक्षात्कार झाला होता. आपल्या निस्मीम भक्तीमुळे त्यांच्या अंत्यसमई वैकुठवासी झालेल्या तुकाराम महाराजांना मृत्युलोकी परत यावे लागले हे सर्व साक्षी सत्याच आहे.

     त्याचे कार्य सर्व समाज बंधु-भगिनींनी असेच पुढे नेहुन जय संताजी फक्त ओठातुन न बोलता ते पोटातुन निघावे एवढीच श्री संताजी चरणी प्रार्थना !!!

 ॥ जय संताजी ॥       ॥ जय तेली समाज ॥

   लेखिका : - सौ. सुरेखा राजेंद्र हाडके
 मु.पो. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा
 रूपाली प्रिटींग प्रेस मेनरोड, पिन नं. ४१२ ८०१

दिनांक 25-02-2015 20:04:36
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in