शिंदखेडा - तालुक्यातील दोंडाईचा शहरात बालवाडीत शिकणाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारया नराधमास आणि त्यास पाठीशी घालणा-यांना त्वरित अटक करुन कठोर कार्यवाही करावी, या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शिंदखेडा येथील तेली समाजाने तहसीलदारांना निवेदन दिले. दोंडाईचा येथील ज्ञानोपासक संस्थेच्या नूतन विद्यालयातील बालवाडीत शिक्षण घेणा-या पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. याबाबत संबंधित संस्थेच्या सभासदांना सांगूनदेखील आरोपीवर कार्यवाही करण्यात आली नाही, असे कृत्य करणारया नराधमास व त्यास पाठीशी घालणा-यांना लवकरात लवकर अटक करुन कठोर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा दि.२१ फेब्रुवारीला मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नायब तहसीलदार पंकज मंडाले व एपीआय रमेश चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. याप्रसंगी तेली समाजाचे प्रकाश चौधरी, दीपक चौधरी, सुनील चौधरी, डॉ. नितीन चौधरी, राजेंद्र चौधरी, किरण चौधरी, विनोद चौधरी, निंबा चौधरी, संतोष चौधरी, आत्माराम चौधरी व नागरिक उपस्थित होते.