वर्धा : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वर्धा जिल्हा कमिटीच्या सदस्या कॉम्रेड प्रभाताई रामचंद्र घंगारे यांचे रविवारी हृदयविकाराने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात त्यांचे देहदान करण्यात येणार आहे.
वर्ध्याचे माजी खासदार व आमदार दिवंगत रामचंद्र घंगारे यांच्या त्या पत्नी होत्या. प्रभाताई यांनी विद्यार्थी दशेतच ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्या माध्यमातून सामाजिक काम सुरू केले. सेवानिवृत्तीनंतर १९९० पासून त्यांनी वर्धा जिल्ह्यात जनवादी महिला संघटनेचे कार्य केले. त्यांनी १३० गावांत दारूबंदी महिला मंडळे स्थापन केली. महिला अत्याचार, हुंडाबळी विरोधात त्यांच्या नेतृत्वात असंख्य महिला मोर्चे, आंदोलने करण्यात आली. त्यांनी शेकडो कार्यकर्त्या तयार केल्या. त्यांना नुकतेच जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.