ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त शांताराम अवसरे, यांना विशेष उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाले आहे. यानिमित्त या अधिक-यांचा प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्या ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये एसीपी असलेले अवसरे 1987 मध्ये उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत भरती झाले. त्यांनी आतापर्यंत मुंबई शहर, नाशिक ग्रामीण, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि ठाणे शहर आदी ठिकाणी उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे. दरोडे, घरफोडया आणि खून अशा अनेक गुन्हयांच्या कौशल्यपूर्ण तपासाबद्दल त्यांना 240 बक्षिसे मिळाली आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे नाशिकच्या कुंभमेळयात ते पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळी या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातच कुंभमेळयाचा परिसर असल्याने त्यांनी कुंभमेळयाची कायदा सुव्यवस्था चांगल्या प्रकारे हाताळली होती. सटाण्यातील एका मुलाचे पाच लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झाले होते. त्यावेळी अवसरे हे वणी या अन्य पोलीस ठाण्यात कार्यरत असतांनाही त्यांनी या मुलाची सुखरुप सुटका केली होती. त्यांच्या याच तपासाबद्दल त्यांना उत्कृष्ठ तपास अधिकारी हा मार्च 2005 चा पोलीस महासंचालकांच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.