नागपुर तेली समाज : म्हणतात खेळाडू हा अभ्यासात फार उंची गाठू शकत नाही. पण समाजाची ही मानसिकता पृथ्वीने मात्र पार रबदलून टाकली आहे. पृथ्वीने खेळाच्या रिगणाबरोबर अभ्यासातही बाजी मारली आहे. पृथ्वीने दहावीत पैकीच्यापैकी गुण मिळवून यशाचे शिखर गाठले आहे. शहरात मार्शल आर्टची नॅशनल प्लेअर म्हणून पृथ्वी अनिल राऊत प्रसिद्ध आहे, कारण तिची खेळातील भरारी नेत्रदीपक आहे. वयाच्या अडीच वर्षापासून पृथ्वी मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत आहे. मार्शल आर्टच्या सहा राष्ट्रीय स्पर्धा, बॉक्सिंगमध्येही राज्यस्तरावर यशस्वी वाटचाल. उत्कृष्ट जलतरणपटू, संगीत क्षेत्रात विशारदकडे वाटचाल, जे. एन. टाटा पारसीची स्कूल प्रेसिडेंट, अवघ्या १५ ते १६ व्या वर्षात ६२ मेडल, हे यशाचे वलय तिच्या पाठीशी लागले आहे. आता तर दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवीत स्वत:ला ऑलराऊंडर सिद्ध केले आहे. परीक्षेच्या तोंडावर अंदमान-निकोबारला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत दुसरे स्थान पटकाविले आहे. दहावीचे वर्ष असतानाही पृथ्वीने खेळाकडे दुर्लक्ष केले नाही. पहाटे उठून रनिंग करणे, सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत शाळा, त्यानंतर ६ ते ७ खासगी शिकवणी आणि ७ ते ९ प्रैक्टिस अशी तिची दिनचर्या वर्षभर होती. शाळेत शिकविलेले रात्री वाचणे आणि होमवर्क पूर्ण करणे हाच तिचा अभ्यास. शाळेला कधी खंड पाडला नाही. उलट स्कूल प्रेसिडेंट असल्यामुळे प्रत्येक उपक्रमात तिचा सहभाग असायचा. पण अंदमानहून नॅशनल खेळून आल्यानंतर एक महिना तिने झपाटून अभ्यास केला. शाळेतील मीना देवनानी, अबान भंगारा आणि सीमा जोशी याचबरोबर रवींद्र गायकी यांचे मार्गदर्शन मिळाल्याने ती शिक्षणातही यशस्वी होऊ शकली. पृथ्वीवर तिची आजी मीराबाई यांचे खूप प्रेम आहे. आजीची इच्छा तिला सैन्यात पाठविण्याची आहे. त्यासाठी पृथ्वीने वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे निश्चित केले आहे. भारतीय सेनेला वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी ‘एएफएमसी कॉलेजमधून तिला. एमबीबीएस करायचे आहे. नागपुर तेली समाजातील सर्व संघटनांनी व बांधवा तर्फे अभिनंदन करण्यात आले.