गुणवंतांना सेवेची संधी मिळालीच पाहिजे - आ.जयदत्त क्षीरसागर
बीड, दि.2 :- गुणवत्ता ही कुठल्या एका जातीची मक्तेदारी नाही कतृत्व दाखवणे हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. समाजाला हिनवण्याचे दिवस गेले, आरक्षण व आरक्षणाच्या कुबड्या भविष्यकाळासाठी पुरेशा नाहीत त्यामुळे पारंपारीक व्यवसायापेक्षा लेखणीची परंपरा हाती घ्या असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
जय संताजी प्रतिष्ठाणच्या वतीने माजलगावकर मठ या ठिकाणी तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ तैलीक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आला होता. व्यासपीठावर मन्मथ हेरकर, दिलीप गोरे, बबनराव गोरे, अॅड. शेख शफिक, शाहेद पटेल, दिनेश परदेशी, दत्तात्रय सोनटक्के, उध्दव क्षीरसागर, प्रशांत महाराज क्षीरसागर, रामेश्वर पवार, विजय क्षीरसागर, छगन मुळे, नागोराव देशमाने, विठ्ठल चौधरी, नवनाथ साळूके, दिनेश परदेशी, गणेश पवार, नागनाथ सोनटक्के, राजाराम बन्सोडे व प्रतिष्ठाणचे शिवलिंग क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत संताजी महाराज जगनाडे, स्व.काकू-नाना यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. प्रतिष्ठाणच्या वतीने व माजलगाव, वडवणी, बीड, शिरूर, पाटोदा, परळी व अंबाजोगाई येथील तेली समाज बांधवांनी आ.जयदत्त क्षीरसागर यांचे भव्य स्वागत केले. यावेळी प्रतिष्ठाणच्या वतीने आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते 175 गुणवंत विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक शिवलिंग क्षीरसागर यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा.श्रीराम जाधव यांनी केले. यावेळी तेली समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.