पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, मा. पोपटराव गवळी यांनी विभागाच्या थोडक्यात आढावा घेताना सांगीतले की, पश्चिम महाराष्ट्रातील तेली समाज अल्पसंख्य असुन शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी परंपरागत खाद्यतेल व्यवसायात विभागाची उलाढाल ४०० कोटीची असुन इतर विभागपेक्षा या विभागातील तेली बांधव परंपरागत व्यवसायात प्रथम क्रमांकावर आहेत. संघटनेच्या माध्यमातुन समाज कार्य करत असताना आम्हाला जाती-जातीच्या भिंती उभ्या करावयाच्या नाहीत. भारतीय राज्य घटनेंशी आम्ही बांधील आहोत. जाती पोट-जाती निर्मुलन व जाती अंता साठी लढाई हे आमचे अंतीम उद्दीष्ट आहे. आमचे या तेली संघटनेचे कार्य म्हणजे, आमची ही न्याय हक्कासाठी ची, समता समानता प्रस्थापित करण्याची व परिवर्तनाची चळवळ आहे. ग्रामीण भागातील शैक्षणीक स्तर अजुन सुधारणे गरजेचे असुन आज घडीस मुलींचे शिक्षणातील प्रमाण चांगले लक्षणीय आहे. प्रांतअधिकारी, तहसीलदार सारख्या शासकीय उच्च पदावर मोजकेच लोक पहावयास मिळत आहेत. शासकीय पातळीवर नोकरी मिळवणे गरजेचे आहे कारण सत्ता अधिकारही विकासाची चावी आहे. असे त्यांनी प्रतिपादन केले.
पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष मा. संजय आनंदराव विभुते यांनी नमुद केले की, तेली समाजातील सर्व पोटजाती आम्ही तेली म्हणुन एकत्र येऊन संघटीत झालो असुन आमची त्यामुळे लक्षणीय ताकद वाढली आहे. रोटी- बेटी व्यवहारात संघटना कधीही हस्तक्षेप करत नाही. ज्याचे त्याने ते आपापल्या वैचारीक सुबत्तेवर संभाळावेत| महाराष्ट्रात तेली शब्दावरून जातीचा कोणी अनादर अपमान करत असेल तर ते कदापी खपवुन घेतले जाणार नाही. तेल्या नावाची रोगाची नावे ही समाज मनाची अवहेलना करतात. संसदेतील व विधान सभेतील समाज नेत्यांनी आदेश काढायला सरकारला भाग पाडुन हे व असे इतर जे जातीवरून आमचा अनादर अपमान करणारे आहेत ते शब्द वगळावेत. यासाठी या नेते मंडळींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लिंगायत तेली समाज नेते व भारतीय नाट्य परिषदेचे श्री. सुरेश कोरे हे बैठकीस हजर राहुन मार्गदर्शन करताना म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात समाज चळवळीसाठी लाखो रूपये उभे करावयाची आमची ऐपत व तयारी आहे. त्यात आम्ही कमी पडणार नाही. पुढील मेळावा सर्वांच्या विचाराने नियोजन पुर्वक मोठ्या स्वरूपात घेऊ असे त्यांनी नमुद केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. भुषण करडीले यांनी विभागीय पदाधिकार्यांना कडक शब्दात समज दिली की, तेली म्हणुन आपण राज्यभर व देशभर एकत्र येत असुन आता पुरे झाले, एकदाचे त्या तिळवण तेली शब्दाचे केळवण करून त्याची आता बोळवण करा. त्यांचा असा रोख होता की, परिवर्तन स्विकारून एकता मजबुत होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील जे काही मोजके लोक तिळवण तेली शब्दास धरून बसले आहेत त्यांनी आता स्वत:चा उल्लेख आता फक्त तेली समाज असा करावा. हे सर्वांच्यच हिताचे आहे. पदाधिकार्यांनी संघटनेचे रजिस्ट्रेशन व इतर बाबींची चौकशी न करता आपले समाजकार्य चालु ठेवावे. प्रदेश कोषाध्यक्ष मा. गजानन (नाना) शेलार यांनी समाज जरी अल्पसंख्य असला तरी समाजाची सध्य स्थीती अचुक जाणुन घेण्यासाठी समाज जनगणनेचे महत्व समजावुन सांगितले. पुढील दोन महिन्यात पदाधिकार्यांनी आपआपल्या जिल्हा तालुक्यातील नियुक्ता पुर्ण करून तेथील जनगणना पुर्ण करावी. फॉर्म सह इतर मदतीसाठी तुमच्या विभागीय अध्यक्षांची मदत घ्यावी असे सुचविले.