दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी गुणांपेक्षा गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावे. आजचा विद्यार्थी कोणतेही शिक्षण घेत असला, तर विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठा अधिकारी झाला, तर त्याचा गौरव करण्यात मला आनंद होईल. विद्यार्थी शिक्षणासोबतच राजकीय व सामाजिक घडामोडींचे ज्ञान ठेवून त्यातही करिअर करावे, असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केले. जिल्हा तैलिक समितीतर्फे रविवारी टाऊन हॉल येथे समाजातील दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते. गुणगौरव सोहळ्याचे उद्घाटन अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विलास भाले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा तैलिक समितीचे अध्यक्ष प्रा. संजय आसोले,तर प्रमुख वक्ता म्हणून माजी मंत्री सुरेंद्र भुयार, तर प्रमुख पाहुणे वामन शिरभाते, प्रा. दिलीप तांबेकर, उपशिक्षणाधिकारी मिलिंद राजगुरे, दिनेश बिजवे, विकास शिरभाते, नितीन गभणे, डॉ. मंगेश गुल्हाने, डॉ. अजय गुल्हाने, नितीन बाखडे, प्रा. डॉ. संजय जयसिंगपुरे, प्रा. डॉ. संजय तिरर्थकर उपस्थित होते. प्रा. पुरके यांनी विद्यार्थी घडत असताना सुजाण नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थी व पालकांचा समन्वय या विषयावर अत्यंत महत्त्वपूर्ण व उपयुक्त मार्गदर्शन केले. या प्रसंगी त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांची मनोवस्था पाहता जीवनामध्ये गुणांपेक्षा गुणवत्ता कशी महत्त्वाची आहे यावर सखोल मार्गदर्शन करीत सर्वांची मने जिंकली. डॉ. भाले यांनी शैक्षणिक क्षेत्रात शेती या विषयाचे महत्त्व व विविध संधी यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनुप शिरभाते, नीलेश देशमुख व प्रा. जयसिंगपुरे यांनी केले, तर गंगाधर आसोले यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सांगता झाली. कार्यक्रमाला समाजबांधव व भगिनी उपस्थित होत्या.
यांचा झाला गौरव - या प्रसंगी ७ आचार्य पदवी प्राप्त, १३ उच्च पदवीधर, २५ पदवीधर, १५ क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेले खेळाड़, ५० विद्यार्थी बारावी, तर ९० दहावीमध्ये नेत्रदीपक यश मिळवलेल्या एकूण २०० गुणवंत व यशवंतांचा या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी समाजातील तरुणाईने सांस्कृतिक कार्यक्रमातून कला कौशल्याचे दर्शन घडवले.