नगर शहरातील प्रसिध्द उद्योजक समाजभूषण मा श्री.अरविंदशेठ दारुणकर यांनी आपल्या कन्येच्या विवाहसोहळ्यात उपस्थित सर्वच मान्यवरांचा मानसन्मान राखत सत्कार सोहळ्यातील हार-तुरे आणि फेटे शाली वगैरेंना फाटा देत त्या रकमेतून वांबोरी येथे निर्माण होत असलेल्या संतश्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे भवन या वास्तूच्या बांधकामासाठी ११,१११ रुपयांचा धनादेश प्रदान केला.वांबोरी तेली समाजाच्या वतीने आदिनाथ मोरे,प्रशांत साळुंके, अरविंद मोरे आणि महेश साळुंके यांनी त्याचा स्वीकार केला. नगर शहरातील वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांत सतत आघाडीवर असलेले तरुण उद्योजक श्री मिलिंद क्षिरसागर आणि प्रा श्रीकांत सोनटक्के आणि श्री.अरविंदशेठ यांच्या सर्वच सहकारी समाजबांधवांनी यावेळी विशेष सहकार्य करीत या लग्नसोहळ्यात हा कार्यक्रम घडवून आणला.मित्रांनो हल्ली सगळीकडेच आपली खोटी प्रतिष्ठा,आणि श्रीमंतीचा देखावा करीत चढाओढीने मुलामुलींची लग्ने लावली जात आहेत.स्वतःला "सुशिक्षित" म्हणवून घेणारी अनेक मंडळी या लग्नसोहळ्यामध्ये अक्षरशः लाखो-करोडोंचा चुराडा करताना आपण पाहतोच.एके काळी नगरचे माजी नगराध्यक्ष कै. टी आर दारुणकरसाहेब यांनी समाजासाठी भरीव योगदान देत अनेक समाजोपयोगी कामे करुन ठेवली आहेत.अरविंदशेठ आपण टी.आर. साहेबांचे सुपुत्र या नात्याने 'आधी केले मग सांगितले' या उक्तीप्रमाणे समाजातील अनिष्ट रुढी परंपरांना बाजूला ठेवत गरजूंसाठी आशेचा प्रेरणादायी दीपस्तंभ बनून राहिलात.तुमच्या दारुणकर परिवाराला मोठ्या आदराने "कारभारी"म्हणून संबोधले जाते.आज तुमच्या दातृत्वातून राज्यभरातील समाजमनाला याची प्रचिती आली आहे.आपण उदार मनाने सुपूर्त केलेल्या या रकमेतून आपल्या समाजातील अनेक गोरगरीब मुलामुलींचे वांबोरीच्या या वास्तूत विवाह होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.समाजातील प्रत्येक बांधवांने आपल्या या कृतीतून अवश्य प्रेरणा घेत विवाहसोहळे आणि इतर कौटुंबिक,सामाजिक कार्यक्रमामध्ये विनाकारण आणि वाया जाणाऱ्या खर्चाला बाजूला ठेवावे आणि समाजातीलच गरजवंताना आणि सामाजिक अधिष्ठान असलेल्या कार्याला मदत करावी अशी अपेक्षा यानिमित्ताने समाज बांधवानी व्यक्त केली.