धुळे : सोशल मिडीयाचा वापर अलीकडे वाढल्यामुळे प्रत्येकजण अनेक व्हॉटस्अॅप ग्रुपशी जोडलेला आहे. परंतु, अनेक ग्रुपमधील संदेश हे ब-याचदा निरुपयोगी असतात. त्यामुळे हे ग्रुप असून नसल्यासारखे किंवा निव्वळ 'टाईमपास' ठरतात. परंतु, दोंडाईचा येथील प्रकाश चौधरी यांनी व्हॉटसअॅप ग्रुपचा विधायक वापर करत समाजबांधवांना एकत्र करण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातील एकूण २०८ गावे जोडली आहेत. विशेष म्हणजे या ग्रुपचा वापर ‘टाईमपास' म्हणून होणार नाही, यासाठी कठोर नियमही तयार केले आहेत. दोंडाईचा येथील प्रकाश काशिनाथ चौधरी यांनी दि.१५ ऑगस्ट २०१७ रोजी ‘दोंडाईचा शहर तेली समाज' नावाचा व्हॉटसअॅप ग्रुप तयार केला. समाजात घडणा-या सुख-दुःखाच्या घटना, निवड इ.गोष्टींची देवाण-घेवाण व्हावी, या उद्देशाने ग्रुपची व्याप्ती वाढविण्यासाठी त्यांनी २८ फेब्रुवारी २०१८ रोजी ग्रुपचे नामकरण ‘खानदेश तेली समाज' असे केले. या ग्रुपचा विधायक वापर व्हावा, यासाठी त्यांनी स्वतःच ग्रुपमधील सदस्यांसाठी नियम तयार केले. विशेष म्हणजे राजकारणापासून हा ग्रुप चार हात लांब राहिल, याचीही दक्षता घेतली. १०० टक्के समाजकारण व शुन्य टक्के राजकारण, असे या ग्रुपचे उद्दीष्ट्य. आहे. या ग्रुपमध्ये गुडमॉर्निंग, गुडनाईटस सारखे संदेश टाकण्यास मनाई असून केवळ निधन वार्ता, उत्तरकार्य पत्रिका, लग्नपत्रिका; सामाजिक कार्यक्रमांची माहिती, समाजातील प्राविण्य मिळविणा-या व्यक्तिची बातमी, निवडणूकीस उभ्या असलेल्या व्यक्तिची बातमी, विजयी उमेदवाराची बातमी, समाजात घडलेली अप्रिय घटना, समाजातील गरजूंसाठी आर्थिक मदतीचे अवाहन करणे इ. संदेश या ग्रुपमध्ये टाकता येतात. जेणेकरुन सुख-दुःखाच्या बातम्या समाजबांधवांना कळू शकतील. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाची बातमी ग्रुपमध्ये टाकण्यास मनाई आहे. ग्रुपमध्ये टाकण्यात आलेली 'पोस्ट' तपासण्याचे काम रविंद्र जयराम चौधरी हे करतात. अनावश्यक 'पोस्ट टाकणान्यास ग्रुपमधून १५ दिवसांसाठी निलंबित केले जाते. त्यानंतर १५ दिवसांनी पुन्हा ग्रुपमध्ये घेण्यात येते.
तीन राज्यात व्याप्ती सध्या ग्रुपमध्ये खान्देशातील ३ जिल्हे जोडले असून त्यात मालेगावसह २५ तालुक्यांचा समावेश आहे. शिवाय गुजरात राज्यातील ६ शहरे व मध्यप्रदेश राज्यातील ६ शहरेही या ग्रुपला जोडलेली आहेत. या ग्रुपमध्ये एकूण २०८ गावे जोडण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ग्रुपमधील सदस्यांची संख्या केवळ २३२ इतकी आहे. कारण प्रत्येक गावातील केवळ एकच व्यक्ति (समाजाची तळमळ असलेला) या ग्रुपला जोडला जातो. हा व्यक्ति त्या गावाचे प्रतिनिधीत्व करतो व त्या गावातील समाजबांधवांच्या सुख-दुःखाच्या घटना, कार्यक्रमांची माहिती या ग्रुपमध्ये टाकत असतो. या ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी शुल्क आकारले जात नसले तरी कोणाच्याही वशिल्याने सदस्याचा समावेश केला जात नाही. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा भेदही येथे पाळला जात नाही. गरीबांना समाजासोबत प्रवाहात घेवून चालने, हे ग्रुपचे उद्दीष्ट्य आहे. समाजबांधवांना मिळाले व्यासपिठ या ग्रुपमध्ये अनेक गावे जोडली गेली असून समाजबांधवांना एक चांगले व्यासपिठ मिळाल्याची भावना समाजबांधव व्यक्त करतांना दिसत आहेत. समाजाला एकत्र आणण्यासाठी शिस्तप्रिय असा व्हॉटसअॅप ग्रुप तयार केल्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. समाजातील घडणा-या घडामोडी या ग्रुपद्वारे समजत असल्यामुळे समाजबांधवांना या ग्रुपचा मोठा फायदा होतांना दिसत आहे.