संपुर्ण समाजाला पुण्यातील आणि पुण्याबाहेरील संपुर्ण महाराष्ट्रात ज्याचं नांव आतीशय गौरवानी व आदराने घेतल जातं असं उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणजे स्व. रावसाहेब पन्हाळे
त्यांचं बालपण आतीशय गरीब परिस्थीतीत व खडतर आयुष्याचा प्रवास करीत पुढे पुढे स्वकतृत्वावर विश्वास ठेवून, जो नाव लौकीक व वैभव प्राप्त केलं ते एखाद्या कथा कादंबरीपेक्षा वेगळं नक्कीच नाही.
१८९६ साली प्लेगच्या थैमानात संपुर्ण कुटूंबाची वाताहत झाली. वडिलांचं छत्र गेलं. आई, बहिण व जेष्ठ बंधु यांच्या सह पुण्यात बालपण. पण बालपण कसले.... जेमतेम दुसरी तिसरीपर्यंत शाळा शिकुन आई, बहिण, भाऊ यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेवून छोटे मोठे सुतार कामे करू लागले.
परंतु प्रत्येक काम कौशल्यपुर्ण करावयाचे वेळेत करावयाचे त्यांच्या या गुणांमुळे ब्रिटिश अधिकारी सुद्धा त्यांच्याकडून फर्नीचर बनवुण घेवू लागले. त्यांच्या कामाचे कौशल्य बघुन त्यांना सरकारी कामाचे सुद्धा कॉन्ट्रॉक्ट मिळायला लागले.
पुण्यातील लष्करी किंवा सिव्हिल कोणतेही ऑफीस घेतले तरी शंकर रामचंद्र ऍण्ड ब्रदर्स यांचे फर्नीचर आजुनही आठवेलच. कॉन्सिल हॉल गव्हमेंट हाऊस, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, नॅशनल ऍकेडॅमी खडकवासला इ. इ. मिळालेल्या पैशाचा केवळ स्वार्थापोटी विनीयोग न करता त्यांनी बर्याच समाजसेवी संस्थांना शालेय संस्थांना, आरोग्य संस्थांना देणग्या दिलेल्या आहेत.
उदा. श्री. संताजी महाराज जगनाडे संदूंबरे, कमला नेहरू हॉस्पीटल, ससुन हॉस्पीटल, वाडीया हॉस्पीटल, रयत शिक्षण संस्था, सातारा, शिवाजी मराठा हायस्कुल, मॉर्डन हायस्कुल, नुतन मराठी विद्यालय, कॉम्प एज्युकेशन सोसायटी, भजनी मंडळे, क्रिडा मंडळे, संगित विद्यालये, कलाभुवणे, वसतीगृहे, प्रसुतीगृहे, वाचनालये, ग्रंथालये, जनकल्याण संस्था, मंदिरे, मस्जीद, चर्च, धर्मशाळा अशाा शेकडो संस्थांना देणग्यार दिलेल्या आहेत.
समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना रहाण्याची व्यवस्था व शिक्षणाची व्यवस्था परदेशी जाणार्या विद्यार्थींचा सत्कार करणे. प्रोतसहन देणे या गोष्टी रावसाहेंब आनंदाने करत.
समाजाप्रमाणे त्यांचं कुटूंब म्हणजे सुद्धा एक संस्थाच होती. एकत्र कुटूंबाचं सुंदर उदाहरण म्हणजे रावसाहेब पन्हाळे बंगला म्हणुन लोक आदराने अंगुलीनिर्देष करी. ४० - ५० लोकांचं कुटूंब कुठलाही भेंदभाव न करता गुण्यागोविंदाने एकत्र नांदत हांतं लग्न साखरपुडे , बारसे, डोहाळे जेवणं सर्व कार्यक्रम अगदी थाटात पार पडत येणारे जाणारे पाहुणे यांचा सतत राबता असायचा.
बाहेरून येणार्या पाहुण्यांसोबत रावसाहेब जातीने जेवायला असायचे तो गरीब श्रीमंत असा भेदभाव कधी नसायचा. घरातील लहाणापासून मोठ्यांपर्यंत त्यांचं सर्वांवर लक्ष असायचं ते स्वत: तरूणपणी कुस्त्या खेळत असल्याने मुलांनी कुसत्या खेळल्या पाहिजे तसेंच सुट्या लागल्या की मुल मुलींनी पोहायला शिकायला ते पाठवित. शिवाय जेवतांना सुद्धा पुर्ण जेवण जेवलंच पाहिजे. ताटात आजिबात उष्ट टाकलेलं त्यांना आवडत नसे. त्यामुळे आम्हा सर्वांनाच उष्टं न टाकण्याची सवयच लागली आहे.
सर्व नातवांना पतंवांना सोबत घेवुन जेवायला बसायचा त्यांचा शिरस्त होता. आणि खावून माजा टाकुन माजू नका हे त्यांचं बोध वाक्य होतं ते आम्ही कुटूंबीय आजही नेमाणें पालन करतांना दिसतं.
बाहेरगांवचे बरेच लोक डॉक्टरी इलाजासाठी पुण्यात येत त्यांना हॉस्पीटल मध्यें डबे पाठविणे, कुणाला शाळा कॉलेजात ऍडमिशन मिळवून देणे काहींना नोकर्या लावुन देणे, असें सतत नातेवाईक व आप्तेष्टांची वर्दळ घरांत असायची.
त्यांच्या नातीच्या सासर्यांनी त्यांना (मिटकर ) भगवतगिता भेंट दिली होती. व कुणाकडून तरी रोज वाचुन घेवुन एैकत जा म्हणुन सांगितले. दुसर्या दिवसापासुन रोज ऑफीसला जायच्या आधी रोज मला हाक मारत व माझ्याकडून रोज एक अध्याय वाचुन घेत. हा परिपाठ त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी पर्यंत चालू होता..... त्यांची शिस्त दरारा घरात व बाहेर तितकाच असायचा. त्याचं ऑफीसला जाणे, नागेश्वर मंदिरात जाण्याची वेळ, जेवणाची वेळ यावरून घडाळ्याचे काटे फिरत.
एवढं वैभव दानधर्म, कुटूंबाचा गाडा, समाजातील प्रतिष्ठा ऑनररी मॅजिस्ट्रेट ते रावसाहेब किताब. कुठलाही वडिलोपार्जीत प्रॉपर्टी नसतांना कुणाचही पाबळ नसतांना स्वकष्टार्जीत पैशाने करणारे रावसाहेब दानशुर कर्णच होते.
ब्रिठीशांनी त्यांना रावसाहेब हि पदवी दिली असली तरी, ब्रिटीशांना काडीचाही सुगावा लागू न देता ते भारताच्या स्वातंत्रप्राप्तीसाठी राजकारणात पडद्या आडून सेवा करणारे ते स्वातंत्र्या सेनानीच होते तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आशा नामवंत राजकरण्यांच्या संपर्कात असणारे रावसाहेब राजकारणापासून दूरच होते.
वराहगिरी व्यंकटगिरी राष्ट्रपती असतांना श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना रावसाहेबांना पद्मश्री हा बहुमान देवून सन्मानीत करण्यात आले तो सोहळा अवर्णीय होता.
त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व समाजबांधवांनी प्रत्येक जिल्ह्यांत त्यांचं स्वागत केलं. सत्कार झालेत व ते होणे समयोचितच होतेे. कारण रावसाहेब हि व्यक्तीच असं कांही रसायण होतं की, समाज समाजाबाहेर अनेक संस्था रावसाहेबांच्या ऋणांतच राहतील.
असे उत्तुंग व्यक्तीमत्व आपल्यात नाही हि कल्पणाच सहन होत नाही कारण त्यांच्या किर्तीरूपाने ते आमच्यातच आहेत. त्यांच्या स्वकर्तृत्वाला आमचा मानाचा सलाम.
नातस्नुषा
राजश्री भगत