वर्धा : वर्ष २०१९ मध्ये राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती, राष्ट्रीयदिनाचे कार्यक्रम मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये साजरे करण्यासाठी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ डिसेंबर रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. या परिपत्रकात महाराष्ट्राचे थोर संत व तेली समाजाचे आराध्य दैवत संतश्री जगनाडे महाराज जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात संतश्री जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रातिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची गाथा संकलन करणारे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मंत्रालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये साजरी करण्यात यावी यासंदर्भात महाराष्ट्र राज्य तैलिक महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार शिरीष चौधरी, कृष्णा खोपडे, चरण वाघमारे, हिरा चौधरी, अशोक व्यवहारे, आर. टी. अण्णा चौधरी, गजुनाना शेलार, भूपण कर्डिले, पोपट गवळी, मनोहरशेठ सिगारे, विक्रांत चांदवडकर, अनिल चौधरी, विजय चौधरी व महाराष्ट्रातील समाजाचे जिल्हाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मंत्रालय, शासकीय व निमशासकीय कायालयामध्ये साजरी करण्यासंदर्भात निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. संत जगनाडे महाराज यांची जयंती शासनस्तरावर साजरी करण्यात येणार असल्याने त्यांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्यात प्रथमच हा प्रलंबित निर्णय राज्य सरकारने घेतल्याने तेली समाजाला न्याय मिळालेला आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल खासदार तडस यांनी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.