जळगाव, ता. १६ : श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे तेली समाजाच्या पहिल्या राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळावा रविवारी (१८ नोव्हेंबर) सौ. पुष्पवती खुशाल गुळवे (मॉर्डन गर्ल्स) विद्यालयात होईल, अशी माहिती संस्थाध्यक्ष अनिल चौधरी यांनी दिली.
सांखला लुंकड ओसवाल मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस सचिव संदीप चौधरी, उपाध्यक्ष प्रशांत सुरळकर, सुभाष चौधरी, प्रकाश चौधरी, देविदास चौधरी, उमेश चौधरी, भरत चौधरी, डॉ. विलास चौधरी, प्रकाश चौधरी आदी उपस्थित होते. या मेळाव्यास महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश येथून समाजबांधव हजेरी लावणार आहेत. मेळाव्यासाठी आतापर्यंत जवळपास अठराशे इच्छुक उपवर- वधूची नोंदणी झाली असून, प्रत्यक्ष मेळाव्यात सात ते आठ हजार समाजबांधवांची उपस्थिती असेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. तसेच मेळाव्यादरम्यान वधू-वरांच्या माहितीची रेशीमबंध' सूचीचे प्रकाशन होईल. मेळाव्यास जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन आदींची प्रमुख उपस्थिती राहील.