लोहसर/करंजी : गुरुदेव संत नारायण बाबा यांच्या प्रेरणेने सुरू झालेला संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा सालाबादप्रमाणे दि. ३ जानेवारी २०१९ रोजी तारकेश्वर भैरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आला आहे. समाजातील केलेल्या उल्लेखनीय अशा सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक एवं शैक्षणिक, राजकीय कामगिरीबद्दल व समाजसेवेबद्दल दरवर्षीप्रमाणे देण्यात येणारा गुरुदेव संत नारायण बाबा समाजरत्न पुरस्कार यंदा दै. पुण्यनगरीचे संपादक राजेंद्र झोंड, रेणुका माता मल्टीस्टेटचे चेअरमन प्रशांत भालेराव, अक्षर उद्योग समुहाचे अध्यक्ष बलभीम पठारे, मानवसेवा फौंडेशनचे अध्यक्ष सुनील मतकर, विराट प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदिपभाऊ सरोदे, माऊली संकुलचे खजिनदार दिनकरराव घोडके, छत्रपती युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अनिल भाकरे इ. मान्यवरांना तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्रीजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती तारकेश्वर भैरव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमोल क्षीरसागर यांनी दिली आहे. या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ह.भ.प. महंत आदिनाथ महाराज शास्त्रीची (तारकेश्वर गड) यांचे हरिकिर्तनाचे आयोजन केले आहे. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. सदर कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन लोहसर खांडगाव ग्रामस्थ व समस्त तिळवण तेली समाजातर्फे करण्यात आले आहे.