संत जगनाडे महाराजांची जयंती शासन स्तरावर खा. तडस यांनी लावून धरली होती संताजींच्या जयंतीची मागणी
अकोला - तैलीक समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या संत जगनाडे महाराज (संताजी) यांची जयंती पुढील वर्षांपासून सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्येही साजरी केली जाणार आहे. राज्य शासनाने दोन दिवसांआधीच याबाबतचे परिपत्रक जारी केले. विशेष असे की ज्या दिवशी मागणी, त्याच दिवशी निर्णय एवढी तत्परता याकामी दाखविण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या आग्रहाखातर वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी ही मागणी लावून धरली होती. त्यांच्यासह विधानपरिषद सदस्य डॉ. रामदास आंबटकर, राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे पदाधिकारी यांची स्वाक्षरी असलेले एक निवेदन अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले होते. त्यांनी लागलीच ही बाब संबंधित खात्याकडे सोपवून सामान्य प्रशासन विभागामार्फत त्याची नोंद घ्यायला लावली. खासदार रामदास तडसे यांचे स्वीय सहायक तथा तेलीक महासभेचे विभागीय सहसचिव राजेंद्र हजारे यांनी याकामी सतत पाठपुरावा केला. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर बुधवारी सकाळी खासदार व इतरांच्या स्वाक्षरीचे निवेदनमुख्यमंत्री महोदयांकडे सादर केले गेले. नेमक्या त्याच दिवशी महापुरुषांच्या जयंती-पुण्यस्मरणाबाबतचे सरकारी परिपत्रक जारी केले जाणार होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लगेच ही कार्यवाही करुन घेतली. अशाप्रकारे सायंकाळी जारी झालेल्या परिपत्रकामध्ये संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीचाही समावेश केला गेला. त्यानुसार पुढील वर्षीपासून प्रत्येक ८ डिसेंबरला संत जगनाडे महाराज यांची जयंती राज्यभरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्येही साजरी केली जाईल. या जयंत्युत्सवाचे आयोजन महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेतर्फे ठिकठिकाणी आधीपासूनच केले जाते. त्यात आता शासकीय व निमशासकीय कार्यालयांचीही भर पडणार आहे. या निर्णयामुळे तैलीक समाजाचे नागरिक आनंदित झाले असून महासभेच्या पदाधिकायांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहे.