आहेरा ऐवजी वधू-वर पालकानांं रक्कम देण्याचे आवाहन
औरंगाबाद नववर्षात तेली समाजातील विवाह सोहळ्यात टोपी-टॉवेल आणि आहेर देऊ नये, याऐवजी रक्कम पालकांना द्यावी, असा संकल्प महाराष्ट्र राज्य तेली समाज विभागीय अध्यक्ष कचरू वेळंजकरांनी जाहीर केला. या घोषणेनंतर लगेचच प्रतिसाद मिळाला. तेली समाजाच्या साखरपुडा आणि विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात टोपी आणि टॉवेल यासह आहेरही दिला जातो. याचा जवळपास खर्च २५ हजारांच्या घरात होतो. बड्या घरच्या आसामींसाठी या गोष्टी देणे मोठे नाही. पण, सर्वसामान्यांची ससेहोलपट होते. वेळंजकर म्हणाले, समाजातील प्रत्येकजण आपल्या ऐपतीने सोहळा साजरा करतो. पण, मुळात टोपी आणि टॉवेल ही पद्धत आता मोडीत काढलीच पाहिजे. कारण ना कोणी टोपी वापरतो ना कुणी टॉवेल वापरतो. पण रीत म्हणून हे साजरे केलेच जाते. याशिवाय आता आहेर दिलाच पाहिजे म्हणून साड्या घेतल्या जातात. पण, त्यांचा वापर सर्वसामान्य करतच नाहीत. त्याच साड्या पुढच्या विवाह सोहळ्यात खपवल्या जातात. हा सर्व खेळ बंद केला पाहिजे. आगामी विवाह सोहळ्यांत आहेर देणे-घेणे बंद करून यावर खर्च होणारी रक्कम वरवधूच्या पालकांना द्यावी. ही प्रथा बंद झाली पाहिजे याकरिता सर्वजणांनी संमती दिली. नुकत्याच वाळूज येथे झालेल्या आंबेकर आणि आव्हाड कुटुंबाच्या सोहळ्यात याची अंमलबजावणीही झाली.
साखरपुडा कार्यक्रमांनाही यापुढे द्या फाटा
साखरपुडा हा फक्त मुला-मुलीचा विवाह जुळला आहे, असा संदेश समाजात देतो.पण, यावरही मोठा खर्च केला जातो. या खर्चालाही आता फाटा दिला पाहिजे. साखरपुडा हा घरगुती सोहळा केला पाहिजे. हळूहळू समाज बदलेल. हे पहिले पाऊल आहे. दोन्ही कुटुंबांचा टोपी-टॉवेल आणि आहेराचा अंदाजे ५० हजारांचा खर्च टाळला जातो. ही रक्कम इतर महत्त्वाच्या आणि गरजेच्या वस्तूंसाठी उपयोगी पडते. कचरू वेळंजकर, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तेली समाज