तेली समाजातील महान विभुती (भाग 1)
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
तेली समाजाला फार दैदीप्यमान वारसा आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर तेल्यांनी आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवला आहे. मेघनाद साहा सारखा स्वतंत्र भारताच्या अणुसंशोधनाचा पाया घालणारा शास्त्रज्ञ, कवियित्री खगणिया, कवी मैथिलीशरण गुप्ता, विरांगणा ताई तेलीण, सरदार तुपे यासारखे लढवय्ये सम्राट चंद्रगुप्त मौर्यापासून नरेंद्र मोदीं पर्यंत राजकारणावर आपली मुद्रा उमटवणारे राजपुरूष अशा जवळजवळ सर्वच क्षेत्रांवर तेल्यांनी प्रभाव गाजवला आहे.
सदर लेखात तेली समाजातल्या संत महंत असणार्या महान विभुतींचा थोडक्यात परामर्श घेवू रामायण कालीन एक महान ऋषी ज्याने स्वत:चा आश्रम स्थापुन फार मोठा शिष्यवर्ग निर्माण केला होता त्या शंभूकापासून ही परंपरा सुरू होते. या संत मालिकेतील काही महत्त्वाच्या विभूती अशा.
जोगा परमानंद :-
संत नामदेवांचे गुरू म्हणुन प्रसिद्ध असलेले महापुरूष भाई जोगा परमानंद. हे तेली ज्ञातीतील होते. संत नामदेवांच्याआधी त्यांनी उत्तर भारताचा दौरा केला होता. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिब या धर्मग्रंथात त्यांच्याही काही रचनांचा समावेश आहे. जोगा परमानंद हे अतिशय उच्च दर्जाचे कवी होते. त्यांनी मोठ्या प्रमाणावर अभंग आणि आरत्या रचल्या. मात्र काळाच्या ओघात त्यातील बरचसं नष्ट झालं. आज काही मोजकं साहित्य उपलब्ध आहे मात्र त्यावरून त्यांच्या कवितेचा आवाका आपल्याला थक्क करतो.
जोगा सदासर्वकाळ भगवंत भक्तीत लीन असत. तोंडाने गीतेचा श्लोक म्हणत लोटांगण घालीत प्रभूदर्शनाला जाण्याचा त्यांचा रिवाज होता. पुढे या महात्म्याने बार्शी येथे समाधी घेतली. मार्गशीर्ष वद्य चतुर्थीस त्यांच्या पुण्यतिथिनिमित्त खूप मोठा उत्सव साजरा केला जातो.