तेली समाजातील महान विभुती (भाग 3) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
खान्देशातील शेंदुर्णी येथे नाटूबाई आणि मुरडाजीबाबा या दांपत्याच्या पोटी कडोबा हे एकविसावे पुत्ररत्न जन्मले. बोलता यायला लागल्यापासून या मुलाने नाम जपायला सुरूवात केली. थोडा मोठा झाल्यावर कोणत्याच कामात त्याचं लक्ष नसे. कधी कधी करडई न घालताच तासनतास रिकामा घाणा चालविला जाई आणि अकारण बैलाला त्रास दिल्याबद्दल बोलणी खावी लागत. एके दिवशी असाच रिकामा घाणा चालताना पाहून मुरडाजींनी त्यांना भरपूर मार दिला. आईने जवळ घेतल्यावर कडोबा म्हणाला, माय ! मी करडई टाकली होती. आई पहायला घाण्याजवळ आली. घाण्यात करडईचा दाणाही नव्हता मात्र घाणा तेलाने भरलेला होता. तिने हा चमत्कार सर्वांना ओरडून सांगितला आणि गावकर्यांनी मुरडाजीबाबाला सांगितले. सच्चिदानंद तुमच्या उदरी जन्मास आला आहे. त्या दिवसापासून कडोबा उकीरड्यावर बसून भजन करू लागला. हातात दगडांचा टाळ आणि मुखाने हरीचे नामस्मरण करीत असे. एके दिवशी कडोबाच्या स्वप्नात हरीची मूर्ती आली आणि म्हणाली, तुझ्या आसनाखाली मी प्रकट झालो आहे. कडोजींनी गावकर्यांना उकीरडा उपसण्याची सूचना केली आणि आश्चर्य म्हणजे शामसुंदराच्या मूर्तीसह अख्खे पाषाणमंदिर उकीरड्याखाली सापडले. मंदिरासमोर वराहमूर्ती होती. लोकांनी मंदिरात प्रवेश केला आणि कडूजी महाराजांचा जयजयकार केला. कडूजी महाराज 105 वर्षे जगले. कार्तिक शु. 15 शके 1741 मध्ये त्यांनी प्राण सोडला.