( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
सर्व संतात तुकोबांना आपण कळस चढविला म्हणतो. तुकोबांचे अभंग माहीत नाहीत किंवा ऐकले नाहीत असा एकही मराठी माणूस सापडणार नाही. ही महाराष्ट्राची अनमोल ठेव आहे. या ठेवीवरच येथील समाजजीवन उभे आहे. ही ठेव प्राणपणास लावून जपणारे महान पुरूष म्हणून आपण संताजी महाराजांना ओळखतो इतिहास आपल्या पानावर हेच नमुद करत आहे. परंतु काही काळ असा होता की, सुदुंबरे या गावात एक पडकी समाधी हीच फक्त आठवण होती.
मुंबई येथे काही तेली समाज बांधव गंगू तेलीणीचा उत्सव साजरा करीत. या वेळी एक वर्षी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांना निमंत्रित केले होते. ते भाषणाच्या ओघात सांगून गेले. महाराष्ट्राची धनदौलत सांभाळणारा एक संत पुरूष याच समाजात जन्मास आला होता. ही धनदौलत नुसती सांभाळली नाही तर त्याचे लेखन कामही केले आहे. तेव्हा त्यांची आठवण ठेवणेे गरजेचे आहे. तेव्हा या उत्साही मंडळींनी सदुंबरे येथे जाऊन जगनाडे यांचा जन्मोत्सव करावयाचा ठरविला. या वेळी पुणे येथे साथ देणारे रावसाहेब केदारी, रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे हे व वाईचे चिंचकर या व इतर मंडळींच्या भेटी घेतल्या. विठ्ठल नारायण केदारी यांनी आघाडीवर राहून हा उत्सव सुरू केला. या उत्सवाला मूळ स्वरूप व भरभराट होण्यास अनेकांचा त्याग व भविष्याचा वेध घेऊन कार्य करण्याची हातोटी उपयोगास पडली. सुदुंबरे येथे संताजी महाराज जगनाडे तेली संस्था रजिष्टर केली. याद्वारे संतांजींच्या साहित्याचा लोकजीवनाचा शोध व साठवण करीत असताना समाजहित व समाज प्रबोधन याची ही जाणीव होती. यामुळेच शिक्षण समिती यशस्वीपणे कार्य करीत होती.
उत्सव हा एक दिवसाचा न ठेवता दोन भरगच्च कार्यक्रम होऊ लागले. अनेक कार्यकर्त्यांना अनेक कल्पना सुचत, त्या ते मांडत. जे शक्य आहे त्यांची कार्यवाही सातत्याने सुरू आहे. आध्यात्मिक मार्गावरचे बरेच जण नित्यनियमाने इथे भजन - किर्तन करत. ही भक्तिसांप्रदायातील मंडळी नाचत बागडत पंढरीच्या वाटेने विठ्ठलाकडे जात. माऊली व तुकोबांच्या पालखीबरोबर महाराषट्रातील कानाकोपर्यातील दिंड्या व लहान मोठ्या संतांच्या पालख्या येत असत. जसे जमेल, जसे जुळेल त्या दिंडीत त्या पालखी सोहळ्यात सामील होत असत.