श्री संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ : इतिहास (भाग 4)
( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
धोंडिबा राऊत रजा मिळाली की, तळेगाव दाभाडे येथील वारकर्यांची जी दिंडी पंढरीला माऊली बरोबर जावयाची त्यात ते सामील होत. ते साल ७३ किंवा ७४ असावे. धोंडिबा राऊत पंढरीला निघालेत. माऊलीच्या पालखीने पुणे सोडले आहे. दिवे घाट ओलांडून सासवड आले. जेजूरी, वाल्हे व निरा करून - माऊली लोणंदला आलेत. दिंड्या-दिंड्यांतून कीर्तन सुरू आहेत. वारकरी हरिनामात सर्वस्व गेलेत. आजूबाजूचा अफाट जनसमुदाय माऊलीचे दर्शन घेत आहे. धोंडिबा राऊत त्या टाळ मृंदगाच्या गजरात विचारमग्न झालेले. आजूबाजुला अनेक दिंड्या. अनेक संताच्या पालख्या आलेल्या आहेत. या पालख्या वर्षातुन एकवेळ माऊली बरोबर पंढरपुरला जातात व पुन्हा परत आपआपल्या जागेवर. माऊली व तुकोबा यांच हा एक वारकर्यांचा जीवनबिंदू तुकाबाचे अभंग ही मंडळी बागडत गातात. ही ठेव लिहिणारे व जपणारे संताजी महाराज या संताजी महाराजांची पालखी पंढरीला जात नाही. त्यांच्या मनाला हे विचार कुरतडत होते. संताजी महाराजांच्या उत्सवाला जाणे, टाळमृंदगात दंग होणे खिासा पाहून देणगी देणे. आणि वर्षभर तेल-मिठ व भाकर यांची जुळणी करणे हा आपला जीवनक्रम. या जीवनक्रमात चार पैसे शिल्लक रहाता रहाता नाकी नऊ. आपण पुढे होऊन पालखी सुरू कशी करावी. हा ध्यास लागला. लोणंदच्यापुढे जात असताना बरड येथे मुक्काम होता. बरड गाव छोटेच पण या गावात अर्जुनशेठ बरडकर ही धर्मात्मा असामी. हा एकटा माणूस लाखो माणसांना दोन्ही हातानी मदत करणार, वारकरी तृप्त होत. बरड येथे गेल्यावर अर्जुनशेठना सांगावे वाटले. पण कसे सांगावे आपण हे असे ! बरडकर हे असे ! त्यांना सांगावे, का न सांगावे याच विचारात सांगावयाचे राहून गेले.