( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
मनातला हा विचार मात्र सुदुंबरे येथ गेल्यावर जमलेल्या काही ओळखीच्या वारकर्यांना सांगून आपले मनोगत व्यक्त केले. ही वारकरी मंडळी नेहमी जाणारी त्यांना पालखी सोहळ्याची पुर्ण कल्पना असलेली. त्यांना हे विचार पटले. पण पटून करणार काय ? पालखी सुरू करणे व ती सातत्याने टिकविणे ही तशी साधी सोपी बाब नव्हती. त्यांनी राऊतांना सांगितले पण राऊत आपले मत पटवुन देऊ लागले. सरते शेवटी एक दोन जण म्हणाले, ठीक आहे. पालखी सुरू करू पण ही जबाबदारी घेणार कोण ? पालखीबरोबर पायी चालणारे येणार किती ? पायी आले तरी गरजेची साधने मिळणार कशी ? हे सर्व प्रश्न सुटणे गरजेचे आहे. हे सुटले तर पालखी सुरू करावयास हरकत नाही. या वारकरी मंडळींचे मत राऊतांना पटले हे मत जरी पटले वाटेतला डोंगर जरी उभा असला तरी.
ज्या डोंगरावर संत तुकोबाने अभंगरचावेत, संताजीने लेखन करावेत त्याच डोंगरदर्यात राऊत लहानाचे मोठे झालेले. त्यांना संकटावर मात कशी करावी हा ध्यास लागलेला. मग आलेली पत्रे घरोघरी वाटून झाली की ते याच विचारात मग्न असत. विचारातुन काही मार्ग निघत नसे. पण आशेचा किरण मनात उमटत असे.
रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे हे एक समाजाचे भुषण व समाजाचा आधार त्यांच्याच घरी सुदुंबरे येथील कार्यकारणीची मिटिंग होती. ते तळेगावी गेल्यावर त्यांना समजले. या मीटिंगमध्ये विचार मांडावेत हा निश्चय करन ते इंदोरी ते घोरावाडी स्टेशन पायी आले. लोकलला पाय देऊन पुणे स्टेशनवर आले. बरोबरच्या भाकरी एका हॉटेलमध्ये खाऊन पायी चालत रावसाहेब पन्हाळे यांच्या भवानी पेठेतील बंगल्यावर गेले. बरीच कर्ती मंडळी त्या ठिकाणी गोळा झाली होती. अर्ध्या तासात परगावचे येणारे एक दोन जण आले. मीटिंगला सुरूवात झाली. मीटिंगच्या ठरलेंल्या विषयावर चर्चा वगैरे होऊन मीटिंग संपणार तोच राऊत उभे राहिले. आपली आहे ती ओळख सांगितली. संताजी महाराज यांची पालखी आपल्या संस्थेद्वारे पंढरपूर येथे जावी. याबाबत कार्यकारिणीने विचार करावा. मग यावर चर्चा सुरू झाली. वारकर्यांची मते होती तशीच कार्यकारीणीची मते होती. सर्वांनी बहुमताने त्यानी मांउडलेला ठराव फेटाळला. राऊतांना दु:ख झाले. ही आपली मंडळी, पण हीसुद्धा साथ देण्यास असमर्थ आहेत.