पाल्यांना दर्जेदार शिक्षण देणे ही पालकांची जबाबदारी आ.अमरीशभाई पटेल, शिरपुरात तैलिक समाजातर्फे गुणगौरव
शिरपूर मुलामुलींना दर्जेदार शिक्षण मिळवून देणे ही पालकांची जबाबदारी आहे. त्यात अपयश आल्यास येत्या पिढ्यांचे नुकसान होईल हे लक्षात घ्यावे. सर्व सोयीसुविधायुक्त शिक्षण घेवूनच येणारी पिढी स्पर्धेसाठी सज्ज होणार आहे. या पिढीतूनच देशाचे व समाजाचे कल्याण होवू शकेल. आपल्या गरजा कमी करा, अनावश्यक खर्च, हौसमौजेला मुरड घाला पण पाल्याना सर्वसोयीयुक्त शिक्षण द्या असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले.
धुळे जिल्हा तैलिक (तेली) समाज युवक आघाडीतर्फे येथील मुकेशभाई पटेल टाऊन हॉलमध्ये झालेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी, आमदार काशीराम पावरा, म्हाडाचे नाशिक विभागीय उपसभापती बबनराव चौधरी, माजी महापौर जयश्री अहिरराव, शिंदखेड्याच्या नगराध्यक्षा रजनी वानखेडे, बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी, सतीश महाले, देवेंद्र पाटील, नरेन्द्रसिंह सिसोदिया, एसआरपीएफ कमांडन्ट संजय पाटील-चौधरी, चोपडा पालिकेचे गटनेते जीवन चौधरी, प्रतिभा चौधरी, निर्मला चौधरी, पुष्पा बोरसे, नगरसेविका छाया ईशी आदी उपस्थित होते. ___ जयश्री अहिरराव म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर ज्ञानार्जन करण्यासाठी व मर्यादित वेळेत करावा, पालकांनी मुलामुलींना व्यवहार ज्ञानाचे धडे द्यावेत, वैयक्तिक संबंध विकसित करावेत. विजय चौधरी यांनी समाजाने लवचिक होऊन अनिष्ट व कालबाह्य रूढी-परंपरांचा त्याग करावा, गुणवतांना प्रोत्साहन देण्यावर भर द्यावा असे आवाहन केले. बबनराव चौधरी यांनी समाजाने सर्व उपक्रम एकजुटीने राबवावेत असे आवाहन करून पालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास भव्य समाजभवन बांधण्याचा संकल्प जाहीर केला. आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, मुलामुलींना त्यांच्या कलाने करिअर निश्चित करू द्यावे, त्यांना स्वक्षमतांचा विकास करू द्यावा. नोकरीसह स्वयंरोजगाराच्या वाटाही खुल्या आहेत. राजकारणात देखील उत्तम करिअर घडवता येते. समाजाला बदलवण्याची सुरवात स्वतःपासून करायला हवी.
आरोग्यासाठी सेवा : आमदार पटेल म्हणाले की, शेतीसाठी पाणी, विद्यार्थ्यांसाठी के जी टू पीजी शिक्षण, अल्पशिक्षित युवकांसाठी स्थानिक पातळीवर रोजगार या क्षेत्रात भरीव काम केले आहे. आता परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा देण्यासाठी काम सुरू आहे. येत्या दोन महिन्यात ५०० बेड्सचे अत्याधुनिक रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरू होईल.
गुणगौरव सोहळ्यात स्पर्धा परीक्षा, पदवी, बारावी, दहावीसह विविध परीक्षेतील ४२५ गुणवतांचा सत्कार करण्यात आला. तैलिक समाज युवक आघाडीचे विभागीय अध्यक्ष श्यामकांत ईशी यांनी प्रास्तविक केले. संदीप चौधरी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. सुनील चौधरी, दीपक चौधरी, प्रा.उमेश चौधरी, संताजी जगनाडे महाराज मित्र मंडळ व विघ्नहर्ता संताजी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले.