( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
पालखी विषयी दोघांनी जो वेगवेगळ्या मार्गाने विचार केला तो त्यांनी एकमेकाला सांगितला. विचारांची देवणाघेवाण झाली. एकमेकातल्या उणिवा दूर झाल्या राऊतांची पूर्ण खात्री झाली. हा माणूस नुसता बोलघेवडा नाही. आपल्या प्रमाणे अभ्यास केलेला आहे. हाच माणूस खात्रीशीर सहकार्य करेल. पालखी तुकोबाच्या मागे नेली तर येणार्या अडचणी ह्या माऊलीच्या मागे जाण्यापेक्षा जास्त आहेत. तेव्हा माऊलीबरोबर जाण्यातच हित आहे. पण तरी चौकटीआतील बोलणी. उद्या माघार नको. एकमेक कुठे तरी बांधले पाहिजे.
‘‘ दादा ही आपली बोलणी झाली. तुम्ही हिरीरीने भाग घ्याल याबद्दल मला शंका येते.‘‘
‘‘काय असेल ते स्पष्ट सांगा. मग नंतर काही उरणार नाही.‘‘ दादा भगत
‘‘ तुम्ही भाग घ्याल पण न जाणो उद्या तुम्ही सुरूवात करता करताच दूर झालात तर हसे जसे माझे तसे तुमचेही होईल.‘‘
‘‘तुमचे मत रास्त आहे. पण मी काय करू म्हणजे तुमची खात्री पटेल. मी तुम्ही सांगाल ते करावयास तयार आहे.‘‘
‘‘ तुम्ही संताजी महाराजांची शपथ घेतली पाहिजे. पालखी खुद्द पंढरीला नेऊन परत आणीन.‘‘
‘‘याच सेकंदाला घेतो.‘‘ दादा.
‘‘तुमच्या बरोबर मीही घेतो.‘‘ राऊत