( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
ज्येष्ठ तोंडावर आलेला . यावर दादा व राऊतांनी विचारविनिमय केला. पालखी ही समाजाची आहे आपणा दोघांची नाही पण तरीसुद्धा सुरूवातीला कोणीच सहकार्य करणार नाही. तेव्हा जो खर्च होईल तो दोघांनी निम्मा निम्मा सोसावा. आणि पालखी सुरू करताना येणार्या अडचणी यावर विचारविनिमय झाला. पालखीसाठी बैल, रथ व पालखी या गोळा करण्याची जबाबदारी दादांनी घेतली. पालखी मावळात एका खेडेगावात होती. बरडचे अर्जुनशेठ यांची गाडी पुण्यात आली होती. दादांनी ती गाडी मावळात खराब रस्त्यावरून जीवावर उदार होऊन नेली व पालखी आणली बैल व रथ पुण्यातील एका मुस्लिम गृहस्थाने दिले सुरूवातीला या गोष्टी गरजेच्या होत्या. त्या मिळाल्यावरच पालखी सुरू होणार होती. ही आडचण जरी साधी असली तरी सुरूवातीला तिला डोंगराचे स्वरूप आले होते. ती सोडविण्याचे काम दादांनी केले. त्यामुळे पालखी सुरूवात करण्यास अडचण निर्माण झाली नाही दोघांनी अनेक बांधवांना पालखीची कल्पना दिली.