पुसद 'प्रयत्न आणि निष्ठा प्रामाणिक असल्यास हमखास यश मिळते. यूपीएससी सारख्या स्पर्धात्मक परीक्षामध्ये यश मिळविण्यासाठी योग्य नियोजन, व्यावहारिक नीती कौशल्य व योग्य दिशेने प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक आहे. ध्यास आणि अभ्यास यातूनच यशोगाथा रचता येते', असे मनोगत यूपीएससी च्या ड्रग्ज इन्स्पेक्टर (मेडिकल डिवाइसेस) या परीक्षेत भारताचा अव्वल आलेल्या अक्षय दिनकर गुल्हाने यांनी व्यक्त केले.
येथील कोषटवार दौलतखान विद्यालयात अक्षय गुल्हाने यांचा शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी मुख्याध्यापिका वृंदा पलिकोंडावर यांनी शाल, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सन्मान केला. अक्षय कोषटवार शाळेचे माजी विद्यार्थी असून दहावीच्या परीक्षेत पुसद तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला होता. अक्षयने मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी पुणे येथून व आयआयटी दिल्ली या देशातील नामवंत संस्थेतून एम. टेक. ही पदव्युत्तर पदवी गुणवत्तेसह संपादन केली. कॉर्पोरेट जगतात मोठी संधी असताना प्रशासकीय सेवा परीक्षेची तयारी केली: भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेची तयारी करताना यूपीएससी च्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातील 'सीडीएससीओ' अंतर्गत मेडिकल डिव्हायसेस या नवीन शाखेचे ड्रग्ज इन्स्पेक्टर या परीक्षेत अक्षय गुल्हाने यांनी संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावला, त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी अक्षय गुल्हाने यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आपल्या यशाचा प्रवास उलगडला. संयमासह आई वडिलांचे पाठबळ या यशासाठी आवश्यक असल्याचे मत अक्षय यांनी व्यक्त केले. मुख्याध्यापिका वृंदा पलिकोंडावार यांनी अक्षयने मिळवलेल्या यशाबद्दल गौरवोद्गार काढून विद्याथ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी प्रा. दिनकर गुल्हाने, माजी नगराध्यक्ष डॉ.माधवी गुल्हाने, पर्यवेक्षक सुरेश धनवे व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अर्चना हरीमकर यांनी केले.