पुणे : संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती ८ डिसेंबर रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी केली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. संताजी महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक प्रमुख होते. त्यांच्या अभंग गाथेचे लेखनही संताजी महाराज यांनी केलेले आहे. सुदुंबरे (ता. मावळ) येथे संताजी महाराज यांचे समाधिस्थळ आहे. येथील क्षेत्रास राज्य सरकारने तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे. या ठिकाणी संताजी महाराज जगनाडे तेली संस्था कार्यरत असून, संस्थेच्या व देणगीच्या माध्यमातून अनेक विकासकामे येथे सुरू आहेत. तसेच त्यांचे अधिकृत छायाचित्रदेखील राज्य सरकारतर्फे नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.