( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
चाकणला संताजीची पालखी येणार आहे. तसा निरोप पहिलाच गेला होता. चाकणकर मंडळी सावध होती. तयारीत होती. दोन तीन दिवस समाजातील कर्त्या मंडळींनी समाजबांधवांकडे जाऊन गाठीभेटी घेतल्या. चाकणचा सुपुत्र महाराष्ट्राचा अभिमान. मराठी माणसाची धनदौलत साठवणारा, तुकोबाचा शिष्य संताजी जगनाडे आपल्या पंढरीस जात आहे. जाता जाता आपल्या जन्मभूमीला भेटत आहे. ही भेट अविस्मरणीय ठरावी हा लोकमानस चाकणकर मंडळी टाळमृदंग घेऊन चाकणबाहेर आली. आली आली म्हणेपर्यंत संताजींची पालखी चाकणच्या शिवेवर आली. चाकणकरांचा आनंद शब्दांत मावत नव्हता. हर एकाने या भूमीच्या सुपुत्रांचे दर्शन घेतले मग संताजीचा गजर टाळ-मृदंगात करीत देहभान हरपून नाचत बागडत गावात निघाली गावातल्या धर्मशाळेत रात्रीचा मुक्काम. चाकणकरांनी जेवणाची व्यवस्था न सांगता न सवरता केली. याच मुक्कामावर पालखीला साथ देणारी हाडामासाची, त्यागाची व जिद्दीची माणसे मिळाली. पुण्यावरून एक महाराष्ट्र परिवहन महामंडळाची गाडी त्यांना घेऊन आली. ही मंडळी उतरली. पालखी याच गावात आली हे त्यांना माहित होते.