( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
शून्यातुन सुरू झालेली ही गंगा पावलापावलाने वाढु लागली. पालखी पुण्याकडे निघाली. पुणे तेथे काय उणे ! पुणे तेथे सर्वच नवे असे हे पुणे. या पुण्याच्या मातीचा, या पुण्याच्या पाण्याचा, या पुण्याच्या हवेचा काय गुण असावा कोण जाणे ! परंतु जे पुण्यात पिकते तेेच महाराष्ट्रात ठेाक व किरकोळ भावात विकले जाते. इथे जे पिकत नाही ते इतरत्र पिकून विकेलच याची खात्री नसते. ही पालखी याला अपवाद नव्हती. जर या शहरात तिला योग्य प्रतिसाद मिळाला तर ती भक्कम पायावर उभी रहाणार होती. जे जे चांगले ते ते उचलणे हा पुण्याचा इतिहास. तो इतिहास मनात असल्याने खात्री होती परंतु मनात रूखरूखही अभंगाच्या गजरात पालखी वाकडेवाडीजवळ आले.
सर्कस व्हिला या आपल्या इतिहास संभाळणार्या वास्तूतून श्रीमती प्रमिलाताई धोत्रे या दादा भगतांचा निरोप मिळताच घराबाहेर पडल्या. संताजी महाराजांची पालखी निघावी ही त्यांचे वडील कै. शिवराम पवार यांची जबरदस्त इच्छा होंती. आपल्या वडिलांची इच्छा श्री. राऊत, श्री. दादा भगत यांच्या धडपडीने साकार होत आहे म्हणून त्या पालखीच्या स्वागतास निघाल्या.
आपल्या उतरत्या वयाचे भान नाही. अनेक व्याधी आहेत याचाही विचार नकरता भरधाव वेगात वाकडेवाडी जवळ आल्या. तेथूनच पालखी पुणे शहरात जाणार होती. एक पुणेकर, एक समाजभगिनी म्हणुन त्या पालखीची वाट पाहू लागल्या. पालखी वाकडेवाडीजवळ आली. श्रीमती धोत्रे पुढे झाल्या महाराजांचे दर्शन घेतते. आणि हार घालून आपल्याजवळ त्या क्षणी जेवढे पैसे होते ते सर्व तबकात टाकले.
या ठिकाणी अंबादास शिंदे, तात्यासोा. बाळकृष्ण केदारी ताराबाई सुपेकर, लक्षमण तु. अंबिके, चंपाबाई हिवरेकर, रूक्मिणीबाई दयाराम भोज व इतर दहा - पंधरा जण होते. पालखी पाहुन सर्वांना आनंद गगनात मावेना याचसाठी केला होता आटहास ! तोच समाजाचा आधार म्हणून ज्यांनी लौकिक मिळविला त्या रावसाहेब पन्हाळे, यांच्या मा. दादासोा. पन्हाळे या चिरंजीवांनी पालखी पुण्यात आली हे समजताच चांगला धष्टपुष्ट पांढरा शुभ्र घोडा महाराजांच्या पालखीसमोर दिला. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. आशातला हा प्रकार झाला. पालखीला भव्य स्वरूप येण्यास सुरूवात झाली. सर्वांच्यापुढे ज्ञानेश्वर महाराज मग तुकाराम महाराज, मग चैतन्य महाराज व यांच्या मागे संताजी महाराज असा प्रवास पुणे शहरात सुरू झाला. जागोजागी समाजाची जी घरे होती, ती मंडळी, त्या घरच्या बायका दर्शन घेत होत्या. अनेक बांधव आमच्यात सामील होत होते हळू हळू गंगेचे स्वरूप येऊ लागले.