( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
शहराच्या मुख्य रस्त्यावरून आम्ही कस्तुरे चौकात आलो. दादा भगतांच्या घरातील मंडळींनी दर्शन घेतले. विणेकर्यांना नारळ दिला. दादांच्या वाड्यासमोर पांडुरंगाचे मंदिर, त्या मंदिरात पालखी विराजमान झाली. याच राऊळात पालखी दोन दिवस मुक्काम करणार होती. ही बातमी पुण्यातील सर्व समाजबांधवांना समजली सर्वजण दर्शनास येत होते. या सोहळ्याला यथाशक्ती देणगी देत होते. एक पैसा ही जवळ न घेता सुरू केलेला प्रवास. त्या प्रवासाला हा आसा आधार मिळत होता. सर्वात मोठी देणगी जर त्या वेळी कोणी दिली असेल तर ती मामासोा. कर्डिले यांनी. फक्त एक्कावन्न रूपये. त्यानंतर लगेच तात्यासोा. केदारी यांनीही एक्कावन्न रूपये दिले. अनेकांच्या दहा, वीस, तीस रूपये देणगीने पुढे होणार्या खर्चाला आधार मिळाला.
पालखी सोहळ्यात असलेले शरदराव देशमाने हा एक सुरूवातीचा फार मोठा आधार. पालखीचा हिशिोब लिहिण्याचे काम अंगावर घेतले. पावलोपावली येणार्या अडचणी दूर करण्याची धडपड सुरू केली. पालखीच्या मुक्कामावर कोणात्या गावात समाजबांधव आहेत कोण किती सहकार्य करेल याची चर्चा करून त्यांना कोणती तयारी व सहकार्य अपेक्षित आहे हे पत्राने कळविले. त्यामुळे पुढे येणार्या अडचणी बर्याच प्रमाणात कमी झाल्या. याच वेळी अनुभवी व अभ्यासु ह. भ. प. जनार्दन महाराज टेकवडे हे सामील झाले. त्यांचा अभ्यास चांगला. त्यांचे मार्गदर्शन मोलाचे मानले पाहिजे. या वेळी पायी येण्याची तयारी सौ. गीताबाई दाजी भागवत, सौ. लक्ष्मीबाई बबन वाळुंज, रत्नाकर ( दादा ) भगत यांच्या वयोवृद्ध मातोश्री भागीर्थीबाई यांनी दाखविली व पालखीबरोबर चालत येण्याची तयारी सुरू केली.