( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
वेळ दुपारची हा बिनपावसाचा भाग सुरू झालेला. वर सूर्य चांगलाच तळपत होता. चालून चालून पाय चांगलेच दमले होते. दमला भागलेला प्रत्येकाचा जीव जेवणाची वाट पाहू लागला. सासवड सोडताना दादा भगतांना मागे ठेवले होते. मिळालेल्या शिध्याची पिठलं भाकरी यमाईच्या देवळापर्यंत घेऊन या म्हणून सांगितले होते. ते एखाद्या ट्रकमध्ये जेवण घेऊन येतो म्हणाले होते. त्यांनी सांगितलेला वेळ केव्हाच होऊन गेला होता. त्यांची वाट पाहणे हेच सर्वांचे काम होते. सर्वजण भुकेजल्या नजरेने वाट पाहत होते. राऊतांनी आपली पिशवी व डबे सोडले. जे काय होते ते मूठभूर दिले. पण याने काय होणार ! भुकेजल्या पोटी एक दोन जण तणतणत आले.
‘‘ राऊत, जेवणाचे काय ?‘‘
‘‘जेवण दादा घेऊन येतो म्हणालेत.‘‘ राऊत
‘‘ कधी, संध्याकाळी मुक्कामाला ?‘‘
‘‘ दादा येतो म्हणालेत म्हणजे येणार. शब्दाला जागणार. ते तिकडे, आपण इकडे. काही तरी अडचण झाली असावी. नाहीतर असा वेळ त्यांना होणार नाही.‘‘
‘‘ आम्हाला जेवण पाहिजे.‘‘
राऊत विचाराच्या भोवर्यात अडकले. एक दोन असते तर गप्प बसा म्हणता आले असते. ही चोपन्न मंडळी. गप्प बसवू कसे ? अशा वेळी त्यांना या माळरानावर लगेच जेवण आणून देऊ कसे ? हा विचाराचा धागा डोक्यात एक शीर कुरतडत होता. तोच एक वारकरी जवळ आला. ना ओळखीचा ना पालखीचा.
‘‘राऊत आपणच का ?‘‘ वारकरी
’’हो मीच राऊत. राऊत‘‘
‘‘ आपणास दशम्या हव्यात ना? माझ्याकडे काही आहेत. आपल्याला देऊ घ्या ? ‘‘ महाराज वाटले. त्यांनी त्यांचे पाय धरले. दशम्या देण्याविषयी विनंती केली. त्या वारकर्याने आपल्या गाठोड्यातून दशम्या काढुन राऊताकडे दिल्या. त्यांनी त्या दगडावर ठेवला. परत त्याचे पाय धरले. वारकरी राऊतांना थोपटत व उठवत म्हणाला पंढरपूरच्या वाटेने चाललात या वाटेवर असे भांबावून घाबरून चालणार नाही. या वाटेचा महिमा असा आहे की, जाणार्या प्रत्येक वारकर्याला काही सुद्धा कमी पडत नाही. मनातले जळमट दूर करा. सर्व वारकर्यांना जेवू घाला. ती जवळ विहीर आहे त्यावर पाणी घ्या.
राऊतांनी त्या भाकरी आपल्या पत्नीजवळ सर्वांना देण्यासाठी दिल्या. सर्व वारकरी त्या दशम्या देणारा कोण ते पाहू लागले. पण त्या प्रचंड जनसमुदायात ती व्यक्ती केव्हाच मिसळली गेली. पुन्हा त्याचा शोध घेतला पण शोधले गेले नाहीत. संताजीच्या रूपाने येणारी व मदत देणारी ती व्यक्ती व राऊत बोलत असताना टेकवडे यांनी पाहिले होते. लांबून संभाषण ऐकले होते पण शोध झालाच नाही. त्या दशम्या सर्वांनी खाल्या त्या जेवणाला वेगळीच चव व गोडी होती. तेवढ्यात दादा भगत भाकरीचे गाठाडे घेऊन घामाघूम होऊन शोधत आले. लाखो माणसांच्या समुदायात त्यांची आमची चुकामुक झाली होती. आम्हास शोधत होते. शोधून शोधून दमले आणि दमल्यानंतर शेवटी अशी अविस्मरणीय भेट झाली. दोन अडीच वाजता पालख्या जेजूरीकडे निघाल्या जेजूरीच्या मुक्कामात स्थानिक बांधवांनी सर्व प्रकारे सहकार्य केले व वाल्हे येथे जाण्यासाठी शिवेपर्यत सोबत दिली. याही वेळी आमच्या वारकर्यांत संख्येने वाढ झाली.