( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
जेजूरी सोडल्यानंतर दुपारच्या मुक्काम जवळ जवळ येत असताना एकजण माझी चौकशी करीत जवळ आला. मला मुक्कामावर ह. भ. प. साखरे महाराजांनी बोलाविले आहे म्हणाला. मुक्कामावर मी ह. भ. प. साखरे महाराजांकडे जाताना त्यांचा चोपदार बरोबर होता. त्यांच्या राहुटीत साखरे महाराज विराजमान झाालेत. त्यांच्या सभोवती आठ दहा जण वयोवृद्ध, तपोवृद्ध वारकरी बसलेत. ही सर्व या पालखी सोहळ्यांची कर्ती मंडळी. लाखो माणसांचा समुद्र दर वर्षी पंढरीला घेऊन जाणारी. राऊतांनी त्यांना नमस्कार केला.
‘‘ बसा आपण कोण ?‘‘
‘‘ मी धोंडिबा राऊत रा. इंदोरी जि. पुणे‘‘
‘‘ पालखी कोणाची ?‘‘ साखरे महाराज
‘‘ तुकोबांचे टाळकरी संताजी जगनाडे याची‘‘
‘‘ पालखी कोणी सुरू केली ?‘‘
‘‘मी धोंडिंबा राऊत, रत्नाकर भगत व माझी पत्नी यांनी प्रथम मनावर घेतले व सुरू केली. आमचा अंदाज भरपूर लोकांचा होता. पण बरोबर पन्नास साठ लोकच आहेत. ‘‘?
’’पण राऊत, संताजी जगनाडे यांचे गुरू तुकाराम महाराज. त्यांच्या मागे आपली पालखी जाणे रास्त होते. तो मार्ग सोडून आपण माऊलींच्या मागे मागे का येत आहात ?’’
‘‘जेव्हा पालखी सुरू करावयाची हे निश्चित झाले तेव्हा मी व दादा भगत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख निवृत्ती मोरे यांना भेटलो, तेव्हा त्यांनी आम्हास खडसावून सांगितले, तुम्ही आमच्या मागेमागे येऊ नका आणि हे समजूनही आलात तर तुमचा आमचा वाकडेपणा येईल. या भाषेला आम्ही भ्यालेलो नाही. मुळात ही आमची शून्यातुन सुरूवात. ती पालखी ज्या मार्गाने जाते त्या मार्गाला एक दोन घराशिवाय आमच्या समाजाची घरे नाहीत. या मार्गावर एक दोन गावे सोडली तर प्रत्येक मुक्कामावर बांधव आहेत. ते आम्हास जरूर सहकार्य करतील. संताजी महाराज यांनी तुकोबांच्या अभंगांचे लेखन व जतन केले हे फक्त इतिहासाला व मुठभर लोकांना ज्ञात आहेत. त्यांचे कार्य हे आमच्या समाजासाठी नव्हते. परंतु हा संत बहुजन समाजाला माहीत नाही. ही सुरूवात आहे तेव्हा आम्हाला प्रथम तरी समाज सहकार्यवर अवलंबून रहावे लागत आहे. आम्ही वाटेवरील सर्व बांधवांना भेटलो त्यांनीही आग्रहाने सांगितले, तुम्ही माऊलीच्या मागोमाग या, आम्ही सहकार्य करू.’’ राऊत नम्रपणे म्हणाले.
शांतपणे ऐकणारे साखरे महाराज खवळले ‘‘तुम्ही तुमची पालखी पुन्हा परत तुमच्या मुक्कामावर घेऊन जावा. आम्ही तुम्हाला आमच्या मार्गाने येऊ देणार नाही.‘‘
‘‘महाराज, असे म्हणू नका आमचे लोक कमी आहेत. आमचा उपद्रव कोणास होणार नाही. आम्ही अशोभनीय असे काही करणार नाही.‘‘ विनवणीचा स्वर.
‘‘तुमची विनवनी आम्हाला नको आहे. ही तुमची पालखी परत घेऊन जावा.‘‘ साखरे महाराज
’’महाराज, आपणही भक्त आहात. या माऊलीच्या पालखीचे प्रमुख आहात. हा दिव्य सोहळा आपण पार पाडत आहात. आपली कीर्तने मी अनेक वेळा ऐकलीत. प्रचंड समुदायाला आपण सांगत असता हरिभक्ती वाढवा. हा वारकरी संप्रदाय वाढवा. आणि आजचे या सोहळ्यास जे स्वरूप आले आहे ते येण्यास आपले कष्ट, त्यागसुद्धा कारणीभूत आहेत. आपण जो निर्णय घेतला त्याचा फेरविचार करा मी हात जोडून सांगतो आपणास कोणताच त्रापस होणार नाही.’’
राऊतांच्या या बोलण्याचा परिणाम त्यांच्यावर काहीच होईना. ते जसे हटाला पेटले, तसे राऊत ही त्यांना खंबीर पणे सांगीतले, ’’आम्ही आमची पालखी माऊलीच्या मागेच पंढरीला नेणार. पुन्हा परत जाणार नाही. आणि अनेक विनंत्या करून आपण बदलणार नसाल तर पालखी मागे जाईल. ती माझ्या प्रेता वरूनच. मी घेऊन जाणार नाही. आपण काये ते ठरवा.’’
शेवटच्या टोकाचे हे बोलणे एैकल्यावर बसलेल्या सर्व मंडळींना माझा राग आला. बाजुचे आचारी व कामगार यांनी राऊतांना मारण्यासाठी कोणी उलथणे, कुणी फाट्या, कुणी काठ्या घेतल्या व ही सर्व खवळलेली माणसे राऊतांच्या अंगावर धावून आली. राऊत एक पाऊलही मागे न सरता म्हणाले, ’’महाराज, तुम्ही चोपदाराकरवी निरोप पाठवून मला बोलाविलेत आपणास माझे मत तळमळीने नम्रपणे सांगितले आपण योग्य न्याय न देता सहकार्यांकरवी अतिरेक करीत आहात, हे आपणासारख्या उच्च पदावरील माणासाला शोभत नाही. आपण हे विसरू नका, मला इथे साधा धक्का जरी लागला तरी त्याचे होणारे परिणाम वेगळे असतील. तुम्ही जी चाल करीत आहात त्याच चालीत आम्हीसुद्धा कमी नाही. बर्या बोलाने या मंडळींना आवरा तुम्हाला सांगण्याची माझाी योग्यता नाही. पण प्रसंगच असा आला आहे की, सांगणे गरजेचे आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना केली त्या शिल्पकाराने नियम करून ठेवला आहे तो माहीती आसेल. कन्याकुमारीपासुन हिमालयापर्यंत कोणीच कुणाला अडवू शकत नाही. यावरून आपणास शेवटचे सांगतो, आपण अउवू शकणार नाही. आम्ही याच मार्गाने जाणार. आपण तसा प्रयत्न करू नये इतके झाले तरी आपल्याविषयी आमच्या मनात आदर आहे. आपली योग्यता मोठी आहे. आम्ह्ी आपणास पूज्य मानतो चलतो मी.’’