( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
बरडहुन पालखी नातेपुते वगैरे मुक्काम करीत निघाली. मार्गात जे जे बांधव होते त्या त्या बांधवांनी सढळ हातांनी मदत तर केलीच पण पालखीचे स्वागत व व्यवस्थाही केली. काही जण नातेपुते येथून सोहळ्यात सामील झाले. वारकर्यांची संख्या नदीच्या पुराप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. पंढरीला पालखी गेली. पांडुरंगाचे दर्शन घेतले. राऊत व वारकरी आनंदाने वाळवंटी नाचत होते.
धोंडिबा राऊत व दादा भगत यांचा आनंद गगनात मावत नव्हता. या पांडुरंगाच्या भेटीसाठी किती दिव्य केले. त्या दिव्याचे जे फळ आले ते फळ पाहुन त्यांना जसा आनंद होत होता तसेच पालखीबरोबर आलेले व इतर गोळा झालेले हरिभक्त आनंदी झाले होते.