औरंगाबाद - संताजी जगनाडे महाराज यांना संत तुकाराम महाराज यांचा सहवास वयाच्या दहाव्या वर्षांपासून लाभला. संताजी महाराजांनी व तुकाराम महाराजांनी आपल्या प्रबोधनातून लोकांना जागृत करण्याचे काम केले. तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवल्यानंतरही ती पुन्हा लिहून समाजासमोर शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, असे प्रतिपादन सोमनाथ सुरडकर यांनी केले.
जय संताजी युवा मंच व तेली समाज, मुकुंदवाडी यांच्यातर्फे संताजी जगनाडे महाराज यांची ३९६ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रेरणा बँकेचे उपाध्यक्ष बबन जगताप, किसन ठुबे, किशोर ठुबे, प्रशांत कुरे, जगदीश नांदरकर, नारायण बरकसे, चांगदेव हिंगे, रवी लुटे आदी उपस्थित होते.
यावेळी सुरडकर यांनी संताजी जगनाडे महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. संताजी जगनाडे महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, असे सांगून सुरडकर म्हणाले, आजच्या युवकांनी थोर संतांचा आदर्श घेऊन शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी त्यांचे विचार आत्मसात करावेत. शिक्षण हेच आजच्या काळातील खरे शस्त्र आहे. संत संताजी जगनाडे महाराजांची जयंती शासकीय पत्रक काढून संपूर्ण महाराष्ट्रात साजरी झाली, हा त्यांच्या विचाराचा कार्याचा सन्मान आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अजय शिंदे, आकाश ठोंबरे, प्रदीप शिंदे, ज्ञानेश्वर ठोबरे, संदीप शिंदे, अशोक ठाकरे, अक्षय लुटे, सागर ठाकरे आदींनी परिश्रम घेतले.