चंद्रपूर ब्रम्हपुरी दि. ११ - महाराष्ट्र राज्यातील तेली समाजाचा भटक्या विमुक्त प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेच्या वतीने १९ डिसेंबरला यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे सकाळी १० वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे यात तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन तेली समाजाच्या एकतेची ताकत दाखवावी असे आवाहन चंद्रपूर जिल्हा बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेचे महासचिव प्रा.श्याम करंबे यांनी केले आहे.
भारतातील अन्य राज्यांमध्ये तेली समाजाला भटक्या विमुक्त प्रवर्गातून (NT) आरक्षण दिले जाते मात्र महाराष्ट्र राज्यात तेली समाजला ओबीसी (OBC) इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण दिले जाते.या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची भूमिका बृहन्महाराष्ट्र तेली समाज मंडळ म.रा.मुंबई यांचेकडून घेतली आहे.
राज्यात तेली समाज मोठ्या संख्येने असला तरी तो पोट जातीत विभागला आहे प्रत्येक पोटजातीने त्यांचे स्वतंत्र संघटन केले आहे त्यामुळे समाजची संघटन ताकत विभागली गेल्यामुळे राजकीय स्तरावर कोणत्याही राजकीय पक्षाकडून समाजाला राजकीय वाटा दिला जात नाही. राज्यात तेली समाजाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मागासला आहे. त्यामुळे समाजाला ओबीसी ऐवजी एन. टी. प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यास समाजालान्याय मिळेल व समाजाचा आर्थिक व सामाजिक विकास होईल अशी भूमिका बृहनमहाराष्ट्र तेली समाज मंडळाचे राज्यस्तरीय अध्यक्ष विलासजी वाव्हाळ यांची आहे. समाजाच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी तेली समाजातील सर्व पोट जातीच्या समाज बांधवांनी १९ डिसेंबरच्या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विलासजी वाव्हाळ यांनी केले आहे.