भारतातील अन्य राज्यात तिनी समाजाचा समावेश आरक्षणाच्या भटक्या विमुक्त जातीत करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तेली समाजाला भटक्या विमुक्त जाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे. या मागणीला घेऊन नागपूर येथील अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र तेली समाजाचे नेते संजय कुंभारकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
आगामी काळात होऊ घातलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर माहिती देण्यासाठी दिनांक 12 डिसेंबरला पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. समाजाचा परंपरागत व्यवसाय तेल काढणे, तेलाचा घाणा घेऊन भटकंती करीत तेल काढून देणे व त्या माध्यमातून उदरनिर्वाह करण्याचे काम तेली समाजबांधव करीत होते. याचाच आधार घेत देशातील अन्य राज्यांमध्ये तेली समाजाचा समावेश भटक्या विमुक्त जातीमध्ये करण्यात आला आहे. या प्रवर्गात समावेश असल्याने भटक्या प्रवर्गातील अन्य लोकांना लागू असलेल्या आरक्षणाच्या सवलती तेथे तेली समाजबांधवांना लागू आहेत. एका देशात एका समाजाला दोन न्यायाने आरक्षण मिळत असल्याचे यातून स्पष्ट होते. त्यामुळे अन्य राज्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही तेली समाजाला भटक्या विमुक्त जाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आरक्षण लागू करावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष संजय कुंभलकर यांनी पत्रकार परिषदेत केली. महाराष्ट्रात सद्यस्थितीत तेली समाजाचा समावेश इतर मागास प्रवर्गात असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान या मागणीला घेऊन १९ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला जाणार आहे. या आंदोलनामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शुक्रवार, १३ डिसेंबरला जिल्हा स्तरावरील बैठक भंडारा येथील मंगलमूर्ती सभागृहात घेण्यात येणार आहे. राज्याचे अध्यक्ष विलास वाव्हळ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीला आणि मोर्चाला उपस्थित राहन तेली समाजबांधवांनी उभारलेल्या या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहनही कुंभलकर यांनी केले. पत्रकार परिषदेला जिल्हा सरचिटणीस दामोदर तरारे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख, रोशन काटेखाये, भूपेश तलमले, महेश शहारे, गोविंद चरडे उपस्थित होते.