चांदूर बाजार, ११ डिसेंबर - संत परंपरेतील श्रेष्ठ संत श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचे तैलचित्र सर्वच शासकीय कार्यालयात लावावे, या मागणीचे निवेदन तैलिक समजाच्या शिष्टमंडळाने तहसीदार उमेश खोडके यांना देऊन त्यांना संताजी माहराजांची प्रतिमाही भेट दिली. त्यांनी निवेदनाचा सम्मानाने स्वीकार करून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह तहसील कार्यालयात संताजी माहराज जयंती साजरी केली व त्यांचे तैलचित्र तहसील कार्यालयात लावले.
जगदगुरू संत तुकाराम महाराज समकालीन संत असलेले संताजी महाराज यांना संत तुकाराम महाराजांचे काव्य, अभंग, तुकाराम गाथा मुखोद्गत होत्या. त्या काळात काही मंडळींनी तुकाराम महाराजाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडल्यावरही संताजी माहराजांनी त्या पूर्णलिखित केल्या. त्यामुळे आज हे साहित्य मानवी जीवनाला दिशादर्शक ठरत आहे.
अशा या महान संतांचे जीवनचरित्र त्यांच्या तैलचित्राच्या माध्यमातून जनतेसमोर येण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालयात त्यांची प्रतिमा लावण्याचा शासकीय आदेश नुकताच पारित झाला. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या त्यांच्या जयंतीदिनी तहसील कार्यालयात संताजी महाराजांच्या प्रतिमेचे तहसीलदार उमेश खोडके यांनी पुजन करून त्यांना अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार अर्जुन वाधे, नायब तहसीलदार नीलिमा मते व कर्मचारी उपस्थित होते.