महाराष्ट्र राज्यातील तेली समाजाला भटक्या विमुक्त प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेतर्फे १९ डिसेंबरला यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेचे महासचिव प्रा. श्याम करंबे यांनी केले आहे.
भारतातील अन्य राज्यांमध्ये तेली समाजाला भटक्या विमुक्त प्रवर्गातून आरक्षण दिले जाते. मात्र महाराष्ट्र राज्यात तेली समाजाला ओबीसी इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण दिले जाते. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची भूमिका बृहन महाराष्ट्र तेली समाज मंडळाने घेतली आहे. राज्यात तेली समाज मोठ्या संख्येने असला तरी तो पोट जातीत विभागला आहे. प्रत्येक पोटजातीने त्यांचे स्वतंत्र संघटन केले आहे. त्यामुळे समाजाची संघटन ताकत विभागली गेली. राजकीय स्तरावर कोणत्याही राजकीय पक्षाकडून समाजाला राजकीय वाटा दिला जात नाही. राज्यात तेली समाजाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मागासला आहे. त्यामुळे समाजाला ओबीसीऐवजी एन. टी. प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यास समाजाला न्याय मिळेल. समाजाचा आर्थिक व सामाजिक विकास होईल अशी भूमिका बृहन महाराष्ट्र तेली समाज मंडळाचे अध्यक्ष विलास वाव्हाळ यांची आहे. आंदोलनात समाजबांधवांनी धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वाव्हाळ यांनी केले आहे.