कुंभारात गोरोबा व एकोबा, माळ्यांत सावता, सोनारात नरहरी वगैरे इतर जातीमध्ये असे अनेक भगवद्भक्त होऊन गेले. त्याचप्रमाणे तेराव्या शतकात नामदेवाचे समकालीन असे तेली ज्ञातीत "जोगा परमानंद'' हे भगवद्भक्त होऊन गेले. हा महापुरुष बहुतेक सर्व संतमालिकेत उल्लेखिलेला आहे. कारण हे तेराव्या शतकांत मोठे साधू व बऱ्याच वरच्या दर्जाचे कवी म्हणून प्रसिद्ध होते.
जोगा परमानंद हे मूळ बार्शी येथील रहाणारे होते. जोगा परमानंद ज्ञान । राहे बार्शी माजी आपण। ईश्वर चिंतन करुन । कालक्रमण करितसे ।। असा उल्लेख दासो दिगंबर कृत "संत विजयात " आठव्या प्रसंगात आढळतो. संसारात असल्यामुळे त्यांनी मनास समाधान देणारे व चित्तांस शांत करणारे असे जे ईश्वर भजन अवलंबिले व पुढे त्यात हे मग्न झाले. पुढे हे परमानंद नावाच्या त्या वेळच्या एका साधुपुरुषाला शरण गेले. व त्याचे नाव ह्यांनी आपल्या नावापुढे लावून ते आपणासं जोगा परमानंद म्हणवू लागले. असे ह्यांचे चरित्रकार सांगतात.
जोगा त्यांची भक्ती फारच कडकडीत असे. सर्वकाळ तोंडाने भगवंताच्या भजनाचा सपाटा लावावा व प्रेमाच्या भरात येऊन आनंदाने इलत रहावे असा त्यांचा नित्यक्रम असे. परमेश्वर येथून तेथून एकच. नावे भिन्न घेतली तरी तो सर्व अनाथांचा नाथ भिन्न नाही; सर्व संप्रदाय हे शेवटी त्याच्याच चरणाशी जाऊन ठेवणारे निरनिराळे मार्ग आहेत थोडक्यात सर्वाभूती परमेश्वर सारखाच आहे व सर्व प्राणिमात्र हे परमेश्वराचेच निरनिराळे अवतार आहेत. अशी यांची दृढ समजूत होती. जोगा त्याकाळी बऱ्याच वरच्या दर्जाचा कवी होता. याने बऱ्याच कविता, अभंग व आरत्या रचिल्या परंतु त्या सर्वच आज उपलब्ध नाहीत. एकंदर रचिलेल्या काव्याच्या मानाने पाहता जी भाषा आज उपलब्ध आहे ती फारच अल्प आहे.