वेंगुर्ला तालुक्यातील मांगल्याचा मठ या गावी तेली समाजाचे श्री भूमिका देवीचे मंदिर आहे. या मंदिराचा पूर्वइतिहास काही जात नाही परंतु या समाजाची मुळे कुलदेवता साळशी (ता. देवगड) येथे आहे. त्या देवीच्या प्रतिमेनुसार सन २००० साली या देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून या मंदिरात वर्षातून दोन उत्सव साजरे केले जातात. या मंदिरात श्री भूमिका देवीच्या मूर्तीसोबत मुळपुरुष म्हणून श्रीफळाची पूजा केली जाते. या मुळपुरुषाचा होम हवनाचा कार्यक्रम कार्तिक शुक्ल पौर्णिमेनंतर केला जातो. तसेच दरवर्षी वैशाख कृष्णपक्ष सप्तमी या दिवशी देवीचा वर्धापन दिन साजरा केला जातो. येथील काही भाविक कुटुंबिय केरी, वास्को, आकेरी, कळसुली, इब्रामपुर येथे वास्तव्यास असून देवीच्या उत्सवास एकत्र येतात. या मंदिराचे आर्थिक व्यवहार श्री केशव मठकर हे सांभाळत आहेत तसेच यादेवीची रोज पूजा अर्चा श्री. पांडुरंग मठकर, सुरेंद्र मठकर, मधुकर मठकर व शांताराम मठकर हे तेली कुटुंबीय करत आहेत.