पिंपळगाव, ता वैजापूर (अॅडव्होकेट गणपतराव सावणे, गंगापूर ह्यांनी लिहिलेल्या मुळ चरित्रावरुन संक्षिप्त केलेले चरित्र)
प. पूज्य गोटीराम बाबा यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात मौजे गाढे पिंपळगाव या खेडेगावीतेली समाजात झाला. गोटीराम बाबाच्या वडिलांचे नांव राजाराम आणि आईचे नांव लक्ष्मीबाई. त्यांचा व्यवसाय घाणीतून तेल काढून विकण्याचा, त्यांना एकंदर ५ पुत्र आणि दोन कन्या झाल्यात. त्यापैकी सर्वात वडील बंधूचे नांव विठ्ठल आणि हेच पुढे गोटीराम नावाने ओळखले जाऊ लागले. बालपण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणेच बाबांचे बालपणीच त्यांची लक्षणे इतरांहन वेगळी चमत्कारीक दिसू लागली. बाबाच्या वडिलांना मोठा पुत्र विठ्ठल (गोटीराम) लवकरच शिकून मोठा होईल अशी अपेक्षा होती परंतु बाबा लहान असताना त्यांनी कपडे घालण्यास इनकार केला व वाटेल तसे राहत. घराजवळच श्री राममंदिर आणि श्री हनुमान मंदिर असल्यामुळे बाबांना देवळात राहण्याचे व खेळण्याचे वेड होते. लोकांनी दिलेल्या शिव्या शापाचे व बोलण्याचे त्यांना सोयरसुतक नव्हते. त्यांच्या बाल क्रीडा चालूच होत्या. त्यांचा दगड, धोंडे, गोट्याचा संबंध लोकांना त्रास देण्यासाठी जास्त असल्यामुळे लोक त्यांना गोट्या म्हणून हाक मारीत.
गुरु-शिष्याची प्रथम भेट -
एके दिवशी बाबांच्या आजीने राहीबाईने बाबाला पकडले आणि उघडे नागडे बाबाला मारीत मारीत मंगलदासबाबा समोर आणून पटकले आणि सांगितले याची काही तरी सोय लावा. याने आम्हाला अन् सगळ्यांना त्रासून सोडले. याला येथून सोडू नका आणि हीच गुरु-शिष्याची प्रथम भेट, गुरुमंत्र गोटीरामचे वय साधारणत: १५/१६ वर्षाचे असताना त्यांनी रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचे आणि ३/४ मैल अंतरावर असलेल्या हमरापूर गावी पळत जाऊन गोदावरीचे स्नान करायचे आणि तसेच ओल्या धोतरांवर पळत येऊन मारुतीला प्रदक्षिणा घालायच्या.याच वयात मंगलदास बाबांनी गोटीरामला पहिला गुरुमंत्र दिला आणि त्याचेनंतर तुकाराम खंडू माळी नावाच्या दुसऱ्या एका मनुष्याला गुरुमंत्र दिला. गोटीराम भक्ती मार्गात दंग झाला.
गृहस्थाश्रम -
जवळच्याच खेड्यातून किसन नावाचा एक मनुष्य (तेली समाजाचा) मंगलदास बाबाच्या दर्शनासाठी आला असता बाबा म्हणाले, अरे, गोट्या पीछे रह गया. नारायणका विवाह हो रहा है. तुझे लड़की है तो गोट्यासे विवाह कर दे. आणि तो सदगृहस्थ ही बाबाच्या म्हणण्यावर आपली मुलगी गोटीरामला द्यायला तयार झाला आणि मंगलदास बाबानी गोटीरामला सर्व प्रकारे धाक दाखवून समजावून लग्नाला उभे केले आणि १५ दिवसाचे आत बाबांनी गोटीरामला धाकट्या भावाचे अगोदर विवाहबद्ध केले. लग्नानंतर ४/५ वर्षांनी बाबाला पुत्ररत्न झाले आणि गोटीरामचा गृहस्थाश्रम संपला.