कणकवली भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी प्राणार्पण केले तर बरेच जण देशोधडीला लागले. त्यांचा त्याग आजच्या पिढीने विसरता कामा नये. त्यांच्याच त्यागाची फळं आज आपणाला चाखायला मिळत आहेत. कणकवलीचे कै. मारुती रामचंद्र बांबुळकर व मालवणच्या महादेव बांदेकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता.
ते राष्ट्र सेवा देलाचे काम करीत. खेड्या पाड्यातून उठाव होण्यासाठी लोकांना स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी उद्युक्त करीत असत. अग्रगण्य नेत्यांना पुरक माहिती पुरविणे व तत्सम कामगिरी पार पाडत. वेळ प्रसंगी सत्याग्रह व चळवळी उभारुन लढा देत असत. १९४२ च्या लढ्यात त्यांना सहा महिन्यांचा कारावास व शंभर रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यांच्या सोबत देवगडचे कै. रामभाऊ मुंज हे ही होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ते सामाजिक काम करीत असताना कणकवली ग्रामपंचायत निवडणुकित काँग्रेस तर्फे निवडून आले होते.
आज त्यांची पत्नी श्रीमती मंगला मारुती बांबुळकर या त्यांच्या आठवणी विषद करतात. त्यांना केंद्र शासनाची पेंशन मिळत असून समाजाने त्यांच्या त्यागी वृत्तीचा व देशसेवेचा आदर्श घेण्यासारखा आहे.
- श्री. नंदू आरोलकर