मालेगांव :- इतर मागासांनी आपली जात न लपवता राजकिय सामाजिक समतेसाठी धाडसाने पुढे आले पाहिजे, मंडल आयोगामुळे इतर मागासांची अस्मिता जागृत झाली. या आयोगाच्या सर्व शिफारशी अंमलात आणण्यासाठी सर्व ओबीसी नी एकजुटीने लढा दिला पाहिज असे उद्गार ओबीसी सेवा संघाच राज्याध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी काढले.
ओबीसी सेवा संघाची राज्य स्तरीय बैठक मालगाव येथिल कृष्णा लॉन्सच्या सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. अध्यक्ष स्थानी पुणे जिल्हाध्यक्ष रमेश भोज होते.
प्रारंभी ओबीसीसाठी आयुष्य वेचलेले सुप्रसिद्ध विज्ञान लेखक प्रा. वसंतराव कर्डीले यांना सेवा संघातर्फे जाणिव पुरस्कार, फुले पगडी, मानपत्र, भेट वस्तु शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रदीप ढोबळे पुढे म्हणाले की, विशिष्ट व्यक्ती बुद्धीमान असतात हा एक गैरसमज आहे. अनेक वर्षाचे निकाल हे याच प्रमाण सांगतील. शिक्षणाद्वारे उन्नतीचा मार्ग ज्या म. फुलेंनी सांगीतला त्यांनाच दुर्देवाने ओबीसी मंडळी निट समजु शकली नाही. हजारो वर्षाच्या व्यवस्थेने निर्माण केले मागासलेपण तात्काळ मिटु शकत नाही. मागास व इतर मागास यात स्पर्धेचा समान पातळी निर्माण करावयाची असेल तर आरक्षण गरजेच आहे.
याप्रसंगी जाणिव पुरस्कार विजते प्रा. वसंतराव कर्डीले म्हणाले की, भारतात 6500 जाती असल्या तरी सर्व जातीचा ओबीसी हा कणा आहे . पुर्वी त्याची संख्या 52 % होती. आज ती 65 % च्या पुढे आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी सत्ताधारी होऊ शकतात. मात्र त्यांच्यात एकजुट नाही. तसेच राजकीय जागृती नाही. 1902 मध्ये छत्रपती शाहु महाराजांनी ओबीसीसाठी 50 टक्के प्रथम आरक्षण दिले. 1928 साली सायमन कमिशनपुढे श्येडुल्ड कास्टची यादी आंबेडकरांनी दिली तर श्येडुल्ड कास्टची यादी ठक्कर बाप्पांनी दिली. यावेळी ओबीसींच प्रतिनिधी डॉ. चौरसिया हजर होते. पण त्यांच्याजवळ ओबीसींची यादीच नव्हती. ती राहीली असती तर लोकसंख्या इतके हक्क ओबीसींना मिळाले असते. 3743 जातींचा मंडल आयागाने अभ्यास करून 13 शिफारशी सुचविल्या. त्यातील अत्यंत कमी स्विकारल्या गेल्या. एससी साठी 15 टक्के तर एससी साठी 8 % व ओबीसींना 27 टक्के आरक्षण असे तरी अनेक प्रगत भामट्या जाती ओबीसीमध्ये प्रवेश मिळविला. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत खर्या ओबीसींना डावलुन खोट्या ओबीसींनी निवडणुका लढविल्या. एससी व एसटी यांना नोकरीत जशी पदोन्नती मिळते तशी ओबीसींना मिळत नाही. ओबीसींच्या हक्कावर सतत हल्ले होत आहेत. असे असुनही ओबीसींचा वर्ग उदासिन आहे. हा वर्ग जोपर्यंत रस्त्यावर येऊन संघर्ष करीत नाही तोपर्यंत त्याचे प्रश्न सुटणार नाहीत. मागास व इतर मागासांचे कोणत्याही अभ्यासक्रमात प्रथम गुणवत्तेनुसार गुण धरले जातात. त्याची सर्वसाधरण उमेदवारच घेतले जातात. मात्र काही संस्था या नियमाचा सर्रास विपरीत अर्थ काढतात. व इतर मागासापेक्षा कमी गुण मिळवणारा विद्यार्थीही निवडला जातो. अस प्रकार जेथे होत असतील तेथे सर्रास न्यायालयात जावे असा सल्लाही प्रा. कर्डीले यांनी दिला.
यावेळी ओबीसींचे प्रतिनिधी म्हणुन तेली, माळी शिंपी, वाणी सोनार, भावसार, कासार इ. जातीचे सभासद हजर होते, सभेस पुण्याचे रमेश भोज, कोल्हापुरचे दिंगबर लोहार, नितीन बुटी, जेष्ठ पत्रकार भगवान बागुल, इ. नी मार्गदर्शन केले. तसेच संजय येवला यांनी नॉन क्रिमिलीयर सवलतीसाठी कसा लढा दिला याचे सुरेख वर्णन केले.
चर्चेत रविंद्र बोरसे, ललीत तिळवणकर, दिलीप कोठावदे, पंढरीनाथ गीते, संतोषसंदुरकर, शिावाजी करडे, योगेश चव्हाण, दत्ता चौधरी, आनंदा अहिरे (न्हावी अप्पा) इ. नी. भाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक ओबीसी सवा संघाचे अध्यक्ष रमेश उचित यांनी केले. सुत्रसंचालन संदीप सुर्यवशी यांनी केले. तर अभार प्रविण चौधरी यांनी मानले.