संताजी तेली बहुप्रेमळ ! अभंय लिहितसे जवळ । धन्य त्याचे सबळ । संग सर्व काळ तुकयाचा ।।
अशा या संताजींचे घराणे पुणे जिल्ह्यातल्या चाकण गावचे. हे गाव दोन पेठांच्या मध्ये वसलेले! चाकणच्या जवळच पुण्यासारखी व्यापार उदिमासाठी समृद्ध बाजारपेठ आणि दुसरीकडे जवळच देहूआळंदी ही अध्यात्मपेठ आणि संतपीठ, अशा या चाकणमध्ये पांडुरंगशेठ सोनवणे (जगनाडे) हे धनाढ्य व्यापारी राहत होते. सर्वच बाबतीत संपन्न अशा चाकणमध्ये शेंगदाण्याचे, तिळाचे आणि करडीचे तेल काढण्याचे घाणे होते. आजही यासाठी चाकण प्रसिद्ध आहे. तेलघाणे चालवणारे पांडुरंगशेठ यांचे चिरंजीव नारायण, ते वडिलांचा व्यवसाय उत्तम चालवीत असे. नारायणपुत्र विठ्ठलपंत हे सुद्धा व्यवसायात निष्णात तितकेच धार्मिक विचारांचे, जवळच्या सुदुंबरे गावातल्या मथाबाई काळे योंच्याशी विठ्ठल यांचा विवाह झाला. विठ्ठल - मथाबाई या दाम्पत्याचे सुपुत्र म्हणजे संताजी. सर्वानुमते संताजींचा जन्म इ.स. १६२३-२४ साली झाला.
समृद्ध अशा भरल्या घरात संताजी मोठे होत होते. व्यवसायाची कौशल्ये, लिहिणे, वाचणे, गणित शिकत व्यवहारही पाहत होते. धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि व्यवहारातील हिशोब लिहिणे यामुळे ते उत्तम व्यापारी आणि श्रद्धावान भक्तही बनले. तल्लख बुद्धी, उत्तम स्मरणशक्ती आणि सुंदर वळणदार हस्ताक्षर असणारे संताजी एकीकडे तेलघाण्यावर तेल गाळण्याचे काम करीत, त्याचवेळी त्यांची भगवंताची भक्तीही चाले. ११ वर्षे वयाच्या संताजींचे 'खेड' गावातील यमुनाबाई यांच्याशी लग्न झाले.
देहू येथे तुकाराम महाराजांची कीर्तने होत असत, ती हळूहळू पंचक्रोशित होऊ लागली. १६४० साली तुकारामांचे कीर्तन चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात होणार हे संताजींना समजले. आंतरिक ओढीने संताजी त्या कीर्तनाला गेले. तुकारामांचे कीर्तन संपले, तरी संताजींची भावसमाधी चालूच राहिली! त्यांच्या वडिलांनी त्यांना जागे केले. संताजी तुकारामांच्या पाया पडले आणि 'शिष्य करून घ्या' म्हणून विणवू लागले. तुकारामांना आपला अकाली गेलेला पुत्र संतोबाच परत मिळाल्याचा आनंद झाला. त्यांनी संताजींना शिष्य' न म्हणता 'तू माझा जिवाभावाचा सखा आहेस' असे म्हणून, संसारात राहूनच भक्ती करण्याचा उपदेश दिला.
मात्र संताजी ऐकेनात. शेवटी अधूनमधून घरी येण्याच्या अटीवर तुकाराम संताजींना सोबत घेऊन गेले. त्यानंतर पुढची १० वर्षे तुकारामांच्या अंतकाळापर्यंत संताजी त्यांच्यात सान्निध्यात राहिले. तुकारामांची कीर्तने होत, ते स्वतः शीघ्रकवी असल्याने नवनवे अभंग त्या कीर्तनात असत. त्या सगळ्या रचना लक्षात ठेवून संताजी सुंदर अक्षरात वह्यांमध्ये लिहून ठेवत. हे तुकारामांचे ज्ञानभांडार प्रसंगी प्राणपणाला लावून त्यांनी जपले. इ.स. १६५० ला संत तुकाराम वैकुंठवासी झाले आणि संताजी चाकणला परतले. प्रपंचात राहून भक्तिप्रपंच चालू ठेवला.
संताजींनीही ग्रंथरचना केली. 'शंकरदीपिका' आणि 'तैलसिंधू' हे त्यांचे दोन ग्रंथ दुर्दैवाने आज उपलब्ध नाहीत; परंतु त्यांनी रचलेले 'घाण्याचे अभंग' उपलब्ध आहेत. निष्ठावंत सहकारी, सखा म्हणजे संताजी हे समीकरण आजही चाकणच्या पंचक्रोशीत सर्वमान्य आहे.
संताजी यांच्या मुलाचे नाव बाळोजी, तर कन्येचे नाव भागीरथी होते. बाळाजी व्यापारउदीम सांभाळीत होते, तर कन्या उत्तम कवयित्री होत्या. 'भागू म्हणे' या नाममुद्रेसह त्यांचे सुंदर अभंग आजही जगनाडी वह्यांमध्ये सापडतात.
इ.स. १६८० ला शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यावर हळूहळू तुकाराम महाराजांचे एकक सहकारीसुद्धा काळाच्या पडद्याआड जाऊ लागले. त्यातीलच एक सहकारी गवारशेठ, जे संताजींचे प्राणप्रिय सखा होते, ते सुद्धा ईहलोक सोडून गेले. त्यानंतर केवळ भजन-कीर्तनातच रंगून काळ घालवणारे संताजी १६९९ साली मार्गशीर्ष त्रयोदशीला वयाच्या ७६ व्या वर्षी पांडुरंगचरणी विलीन झाले.