कै. शंकरराव विश्राम काळे मुळचे वाळकीचे. शरीरयष्टी सडपातळ, रंगाने गोरे, लहानपणा पासून शांत व धार्मिक स्वभावाचे. दर आषाढीस पंढरपूरची वारी करणे. तसेच देहू आळंदीस जाणे, गोकर्ण, महाबळेश्वर, गया, प्रयाग, काशी वगैरे सर्व क्षेत्र फिरुन आले. त्यांना नाना या नावाने ओळखत. मुखात नेहमी पांडुरंगाचे नामस्मरण. ज्ञानेश्वरी अगदी मुखोद्गत. पहाटे उठून प्रातःविधी स्नान, पूजा आटोपून श्री ज्ञानेश्वरी वाचन. नंतर वीणा घेऊन मारुतीच्या देवळात परमेश्वराचे चिंतन करणे, दुपारचे भोजन व विश्रांती नंतर गावात प्रवचन व किर्तन करणे, त्यांचे रसाळ वाणीने ग्रामीण मंडळी बहुसंख्येने जमा होत असे. नगरला आलेवर त्यांचे थोरले बंधू गणपतराव विश्वास काळे यांचे पाया पडत असत, त्यावेळी मुले त्यांना म्हणत की लोक (भक्त मंडळी) तुमचे पाया पडत व तुम्ही एवढें विद्धान ज्ञानी व संत अण्णाचे पाया कसे पडतात ? उलट आम्ही सर्वानी तुमचे पाय धरावयास पाहिजे. त्यावर ते म्हणत की मी कितीही मोठा असलो तर वयाने लहान आहे व अण्णा वडिलांचे ठिकाणी आहे व मोठी भावजय मातोश्रीचे ठिकाणी आहे. भावजयीस ते प्रणाम करीत. कै. गणपतराव व कै. शंकररराव यांचे वयात ३-४ वर्षाचे अंतर असे. १९८० मध्ये त्यांचे निधन झाले.