श्री संताजी महाराज जगनाडे पुण्य तिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
अहमदनगर जिल्हा परिषद गौरवकृत आदर्श शिक्षक प्रभाकर रंगनाथ नागले उपाध्यापक, म. गांधी विद्यालय, प्रवरानगर
यांचा जन्म ५ जून १९४५ रोजी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे झाला. वडील आणि थोरले बंधूपासून शिक्षकी पेशाचा वारसा लाभला. १९६५ पासून रयत शिक्षण संस्थेच्या कोळपेवाडी व प्रवरानगर येथील माध्यमिक प्रशालांमधून शिक्षक म्हणून सेवा. बालपणी घरची परिस्थिती तशीच जेमतेमच, परंतु स्वतः अत्यंत प्रयत्नवादी व हरहुन्नरी आहेत.
नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व स्काऊट गाईड चळवळीतील एक निष्ठावान व धडाडीचे कार्यकर्ते असून सामाजिक वनीकरण, कुटुंब कल्याण कार्यक्रम शालासमूह योजना, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटकांचे दिग्दर्शन, हिंदी, संस्कृत व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस मोठया संख्येने विद्यार्थी बसवून त्यांना विनामूल्य मार्गदर्शन व वृत्तपत्रातून अनेकदा स्तंभ लेखन करून समाज प्रबोधन या सारख्या अनेक महत्वपूर्ण क्षेत्रात भरीव कामगिरी त्यांनी केली आणि म्हणून ५ सप्टेंबर ८५ रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेने त्यांची 'आदर्श शिक्षक' म्हणून निवड केली. सन्मान पत्र व ताम्रपट देऊन खासदार माननिय यशवंत राव गडाख यांचे शुभ हस्ते त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव केला.
याच संदर्भात २५ फेब्रुवारी १९८६ रोजी शिक्षक आमदार माननीय रा. ह. शिंदे यांचे शुभ हस्ते व महाराष्ट्र राज्य स्काउट कमिशनर माननीय पोपटरावजी ठुबे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा स्काऊट गाईड संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार केला.
अनेक मासिकांचे त्यांनी संपादक म्हणून काम केले. १९८४-८५ या वर्षी त्यांच्या शैक्षणिक निबंधाला जिल्हा परिषदेच शंभर रुपयांचे पारितोषिक मिळाले.