श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
कै. बाबुराव किसनराव इंगळे, मा. भूतपूर्व नगराध्यक्ष अहमदनगर शहरपालिका, यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९०८ मध्ये शेवगाव येथे झाला. बालपण गरिबीतच गेले. नगर येथे येऊन मोटार धंद्यांत पदार्पण केले. अनेक अडीअडचणीना तोंड देऊन या धंद्यात विशेष प्रगती केली.
काही काळ बोधेश्वर मोटार सव्हिसचे प्रोप्रायटर होते. त्यानंतर 'अशोक गॅरेज' ची स्थापना करून अनेक ट्रक खरेदी केले. परिस्थिती सुखवस्तु झाली परंतु गोर-गरीबाबद्दलची सहानुभूती कायमचीच. अनेक गरजूंना व संस्थांना त्यांनी आर्थिक मदत केली.
प्रथम १९४३ मध्ये नगर पालिकेत कौन्सिलर म्हणून बिनविरोध निवड झाली. १९४४ ते ४६ मध्ये म्युनिसिपल स्कूल बोर्डाचे चेअरमन होते. १९५० साली नाशिक येथे भरलेल्या तेली समाज शिक्षण परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भषविले. १९५२ सालीं नगर म्युनिसिपालिटोचे अध्यक्षपदी निवड त्यांची झाली. अशा या मान्यवर व्यक्तीने प्रारंभी ट्रक वर क्लिनर पासून अत्यंत खडतर नोकरी केली. जिल्हा लोकल बार्डातही त्यांनी नोकरी केली. विधान परिषदेचे माजी सभापतो श्री. बाळासाहेब भारदे हे त्यांचे राजकीय गुरु. १९५२ ते ५३ या काळात नगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती त्यावेळी पाणी प्रश्न बिकट होता सर्वाना बराेबर घेऊन या समस्येला यशस्वीपणे तोंड दिले.
त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीता पिपळगांव येथील विहीर बांधकाम (वॉटर वर्क्स) योजना पार पाडली. तसेच, नगर शहर व जिल्ह्यातील कुस्तीगिरांसाठी जवाहर स्टेडियम बांधले. यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यात व शहरात प्रथम भारताचे महामंत्री स्व. पंडीत नेहरूंचे नगर शहरात आगमन झाले. त्यांचे शुभ हस्ते जवाहर स्टेडियमचे उद्घाटन झाले. १९४२ ते ६४ या काळात नगर - परिषदेचे सदस्य, बांधकाम व स्थायी समितीचे चेअरमनपद भूषविले. त्यांचे स्वभाव वैशिष्टय म्हणजे त्यांच्याकडे आलेल्या कोणत्याही गरजू माणसाला ते विन्मुख पाठवीत नसत. अल्पशिक्षित असलेल्या या सद्गृहस्थांनी उच्च विद्याभूषित व उच्चपदस्थ व्यक्तींना आपल्या वाक्चातुर्याने जिंकले. स्वतः धनवान असूनही गोरगरीबात मिसळून - त्यांना सहकार्य करुन आपलेसे केले. सर्वधर्म समभावाने त्यांनी सर्व जातीधर्माच्या नागरिकात ऐक्य प्रस्थापित केले.